राज्यातील महत्वाच्या घडामोडी

ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात ईडीचे मुंबई, पुण्यासह 21 ठिकाणी छापे

पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांचे बेकायदा प्रसारण व ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात ईडीने मुंबई, पुणे, दिल्लीसह देशभर 21 ठिकाणी छापेमारी केली. ‘वर्ल्ड कप’दरम्यान पाकिस्तानशी कनेक्शन असलेल्या ‘मॅजिकविन’ वेबसाईटवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लागला होता. पाकिस्तानी नागरिकांकडे मालकी असलेली ‘मॅजिकविन’ वेबसाइट ‘वर्ल्ड कप’च्या सामन्यांचे बेकायदा प्रसारण करण्यात सामील होती. ईडीच्या अहमदाबाद विभागीय पथकाने छापेमारीत 30 लाख रुपये जमा असलेली बँक खाती गोठवली. तसेच सट्टेबाजीतील कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात काही बॉलीवूड सेलिब्रेटींचा सहभाग असण्याचा संशय आहे.

पोलिसाला केली मारहाण

भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाला जुहू पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार हे जुहू पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी दोन जण भांडण करत होते. हा प्रकार तक्रारदार याच्या लक्षात आला. त्यानंतर ते तेथे गेले. पोलिसांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एकाने पोलिसाला मारहाण केली.

पोलिसांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली

सहलीसाठी जात असलेल्या बसच्या तळीराम चालकाने मद्य प्राशन केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने ही अनुचित घटना टळली. त्या तळीराम चालकाला पुढील कारवाईसाठी अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. साकीनाक्यातील एका खासगी शाळेने वार्षिक सहलीचे आयोजन केले होते. शाळेने बस भाड्याने घेतली होती. बसमध्ये एकूण 50 विद्यार्थी होते.

डोंगरीत चार कोटी 70 लाखांचे कोकेन जप्त

डोंगरी पोलिसांनी ड्रग्ज घेऊन आलेल्या एका व्यक्तीविरोधात मोठी कारवाई केली. इम्रान शेख (44) असे त्याचे नाव असून त्याच्याकडे असलेला 940 ग्रॅम वजनाचा कोकेन ड्रग्जचा साठा जप्त केला. या ड्रग्जची किंमत चार कोटी 70 लाख इतकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. डोंगरी पोलिसांच्या पथकाने गस्त घालत असताना निशानपाडा क्रॉस लेन येथे कारवाई केली.

सभापतीपदाची निवडणूक उद्या

मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक 19 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधान परिषदेत केली. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपुष्टात आल्यापासून विधान परिषदेचे सभापती पद रिक्त आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संख्याबळाअभावी त्यांनी निवडणूक टाळली होती. आता राज्यपालांच्या सूचनेवरून 19 डिसेंबरला निवडणूक घेतली जाणार आहे.

आमदारांचे बिल्ले अतिशय निकृष्ट दर्जाचे

महायुती सरकारने नव्याने निवडून आलेल्या सर्वपक्षीय आमदारांना दिलेले बिल्ले (बॅज) अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी आज सरकारी यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे काढले. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील संपूर्ण माहिती घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांचे याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, आमदारांना या वेळेला दिलेले बिल्ले अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करा, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली.

एमपीएससीची 25 तारखेची परीक्षा पुढे ढकला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) येत्या 25 डिसेंबरला ठेवण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते आमदार अनिल परब यांनी आज विशेष उल्लेख सूचनेद्वारे केली. 25 डिसेंबर या दिवशी नाताळ असल्याने उमेदवारांना परीक्षेबाबत संभ्रम आहे. त्याकरिता 25 तारखेची परीक्षा रद्द करून ती पुढील तारखांना घेतल्यास उमेवारांमधील नाराजी दूर होईल. एमपीएससी परीक्षा पुढील तारखांना घेण्याबाबत शासनाने तातडीने विचार करावा, असे आमदार परब यांनी सभागृहाला सांगितले.

इंग्रजी माध्यम शाळांच्या बेसुमार परवानग्या रोखा

राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना बेसुमारपणे परवानग्या दिल्या जात आहेत. त्यांना मर्यादा घाला, अशी मागणी शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी विधान परिषदेत केली. इंग्रजी माध्यमाचा गंध नसलेले शिक्षक उपलब्ध नसलेल्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना परवानगी दिली जात आहे. त्यामुळे तेथील मराठी, हिंदी व उर्दू माध्यमांच्या शाळांच्या पटसंख्येवर परिणाम होत आहे, असे अभ्यंकर यांनी सभागृहात सांगितले.

ईव्हीएमविरोधात संपूर्ण देशात असंतोष पेटेल

विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमविरोधात लोकांमध्ये प्रक्षोभ आहे. केवळ सोलापूर नव्हे तर राज्यात गावागावांत आंदोलन होत आहेत. बॅलेटवर मतदानाची मागणी होत आहे. बॅलेटवर मतदान घेण्याचा सरकारला विचार करावाच लागेल. कारण महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा असंतोष आहे. भविष्यात देशातील जनतेतही असाच असंतोष असू शकेल, असा इशारा शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत दिला.

बिबट्यांची नसबंदी करा

नाशिक परिसरात बिबट्याने गेल्या काही वर्षांत 14 हजार 442 जणांवर हल्ले केले आहेत. याखेरीज बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आजवर 14 हजार 249 जनावरे मरण पावली आहेत. त्यामुळे बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी मोहीम राबवा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी रेटून धरली.

आमदार निवासातील गिझर तीन दिवस बंद

नागपुरात कडाक्याची थंडी आहे. पण आमदार निवासातील गिझरच बंद असल्याने हिवाळी अधिवेशनाला आलेल्या आमदारांच्या डोक्याला मात्र ताप झाला आहे. बऱ्याच आमदारांना थंडगार पाण्यानेच आंघोळ आवरून सभागृहात यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आजारपणाची भीती सतावू लागली आहे. विधिमंडळ अधिवेशनासाठी आमदार निवासात थांबलेल्या आमदारांना वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने गिझरच्या गरम पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. हा मुद्दा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात उपस्थित केला.