VIDEO: धरणाचे पाणी झाले हिरवे, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सामना ऑनलाईन । चंद्रपूर 

चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील निसर्गरम्य अंमलनाला धरणाचे पाणी अचानक हिरवे झाल्याने खळबळ उडाली आहे. धरणाचे पाणी हिरवे होण्यामागे शेवाळ असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत असली तरी नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शेती आणि मत्स्यव्यवसाय संकटात आला आहे. तहसीलदारांनी पाण्याचे नमुने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठवले आहेत. तर जनावरे आणि नागरिकांनाही पाण्यापासून दूर राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

अंमलनाला धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात गडद झाल्याची माहिती स्थानिकांनी प्रशासननाला दिली. त्यानंतर कोरपनाच्या तहसिलदारांनी पाण्याचे नमुने तपासण्याचे निर्देश देऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अंमलनाला हे धरण गडचांदूर शहराच्या जवळ माणिकगड टेकड्यांच्या पायथ्याशी असून नैसर्गिकरित्या उंच टेकड्यांमधून वाहून येणारे पाणी येथे अडविले आहे. टेकड्यांच्या वरच्या भागात सिमेंट कंपन्यांनी चुनखडीच्या खाणी खोदल्या असून या खाणी पाण्याने भरल्याने त्याचा विसर्ग आता धरणात येऊ लागला आहे. हिरवे पाणी नैसर्गिक आहे की दूषित याची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, तज्ज्ञांनी हे एक प्रकारचे प्रदूषण असल्याचे सांगितले आहे आहे. नायट्रोजन आणि फॉस्फरस यांचे संयुग आणि सूर्यप्रकाशामुळे अशा प्रकारचे घातक शेवाळ वाढत असल्यामुळे हे शेवाळ पाण्यातील प्राणवायू नष्ट करून पर्यावरण समतोल बिघडवत असतात. या पाण्याशी वन्यजीव, पाळीव प्राणी अथवा मनुष्य यांचा संपर्क देखील घातक असल्याने यापासून दूर राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. अंमलनाला धरणाच्या आसपास मोठ्या प्रमाणावर शेती असून या धरणाचे पाणी मुख्यत्वे सिंचनासाठी वापरले जाते. त्यामुळे प्रशासनाने धरणाचे पाणी हिरवं झाल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाले आहे.