
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण- कसाल मुख्य मार्गावरील मालवण शहरातील देऊळवाडा येथे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने श्राद्ध घालून निषेध नोंदवला होता. मात्र खड्डे बुजविण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर देऊळवाडा येथील स्थानिक युवा कार्यकर्ते श्रेयस माणगावकर व स्थानिक युवकांनी श्रमदानातून बुधवारी रात्री हे खड्डे बुजवले.
खड्ड्यांच्या समस्येबाबत कोणतीही ठोस उपाययोजना न करता या खड्ड्यांमध्ये केवळ जांभा दगड टाकून दिखाऊ मलमपट्टी केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसामुळे मोठे रूप धारण केलेल्या या जीवघेण्या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने यापूर्वी बांधकाम विभागाच्या नावाने श्राद्ध घालणारे स्थानिक युवक कार्यकर्ते श्रेयस माणगावकर यांनी स्व:खर्चातून खडी व सिमेंट उपलब्ध करून स्थानिक युवकांच्या सहकार्याने बुधवारी रात्री हे खड्डे बुजविले. यावेळी श्रेयस माणगावकर यांच्यासह अनिकेत आंब्रडकर, राज जाधव, तुषार पेडणेकर, सोहम देऊलकर, स्वप्नील मालवणकर, तेजस साळकर, निखिल पारकर, अक्षय माणगावकर, ज्येष्ठ नागरिक नयन महाजन आदी उपस्थित होते.
केवळ जांभा दगड टाकून खड्डे बुजविण्याची तकलादू उपाययोजना करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच याकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने लोकप्रतिनिधी आरामदायी कार मधून फिरत असल्याने त्यांना खड्ड्यांचा त्रास जाणवत नाही, अशी टीका श्रेयस माणगावकर यांनी करत सामान्य जनतेला मात्र जीव मुठीत घेऊन या खड्ड्यांतून वाट काढावी लागते, अशी व्यथाही माणगावकर यांनी यावेळी मांडली. देऊळवाडा येथील उर्वरित खड्डे व एसटी स्टँड समोरील रस्त्यावर पडलेले खड्डेही बुजविण्यात येणार असल्याचे माणगावकर यांनी सांगितले. स्व:खर्चातून खड्डे बुजवून बांधकाम विभाग व लोप्रतिनिधींच्या कारभारावर एक प्रकारे चपराक लागवणाऱ्या श्रेयस माणगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.






























































