
कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी संख्येच्या तुलनेत गाडय़ा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे नियमित गाडय़ांना गर्दी होत असून त्यात फुकटय़ा प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवाशांवर कारवाईची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत डिसेंबरमध्ये जवळपास 44 हजार विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 2.45 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या महिनाभरात कोकण रेल्वेवर 998 विशेष तिकीट तपासणी मोहिमा हाती घेण्यात आल्या. त्यादरम्यान 43,896 विनातिकीट प्रवासी आढळले. मागील संपूर्ण वर्षभरात 8,481 तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. त्यात 3 लाख 68 हजार 901 प्रवाशांकडून तब्बल 20.27 कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली.






























































