सांगा, अंडे आणि कोंबडी शाकाहारी की मांसाहारी!

97

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेद बळकट करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. आयुर्वेदाला जडीबुटीपर्यंत मर्यादित न ठेवता त्यात वेगवेगळय़ा पातळय़ांवर संशोधन करून तो लोकाभिमुख केला पाहिजे, असे सांगतानाच त्यांनी अंडे, कोंबडी शाकाहारी आहे की मांसाहारी हे ठरवण्याची वेळही आल्याचे ते म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत हे राज्यसभेत आयुष मंत्रालयाच्या मागण्यांवर बोलत होते. संजय राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील नंदुरबार येथे आदिवासी भागात गेलो असता तेथे आपल्याला कोंबडीचे जेवण देण्यात आले आणि विशेष म्हणजे आदिवासींनी ही कोंबडी आयुर्वेदिक असल्याचे सांगितले. हरियाणा येथील चौधरी चरणसिंग संशोधन संस्थेचे शिष्टमंडळ आपल्याला भेटले. त्यांनी आयुर्वेदिक अंडे बनवल्याची माहिती दिली. या कोंबडीला आम्ही फक्त हर्बल खाद्यच देतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले. आता अंडे व कोंबडी शाकाहारी आहे की मांसाहारी हे ठरवण्याची जबाबदारी आयुष मंत्रालयाची आहे, असेही ते म्हणाले.

आयुषचा अर्थ जीवन आहे. जीवन चांगले राहण्यासाठी आरोग्य व्यवस्थित राहिले पाहिजे. ऋषी, मुनी तसेच हकिमांनी आयुर्वेदात मोलाचे योगदान दिले आहे. पंतप्रधानांच्या कल्पनेतून साकार झालेल्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाला बळकटी देण्याचे काम करावे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. आयुष मंत्रालयाला अर्थसंकल्पात केवळ 1500 कोटी रुपये देण्यात आले आहेत, ते वाढवून 10 हजार कोटी करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

आयुर्वेदातही नवनवीन संशोधन झाले पाहिजे

आयुर्वेदात उत्पन्न कमी असले तरी त्याची गुणवत्ता अफाट आहे. सगळय़ा उपचार पद्धती वापरून झाल्यानंतर शेवटच्या क्षणी आपण आयुर्वेदाकडे वळतो. आयुर्वेदाचे महत्त्व वाढल्यास त्याचा फायदा देशातील कोटय़वधी गोरगरीबांना होईल याकडे आयुष मंत्रालयाने लक्ष दिले पाहिजे, असे सांगून संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयांमध्ये अजूनही आयुर्वेदाचे डॉक्टर उपलब्ध नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. परदेशात आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे. अमेरिकेत एक टर्मरिक कॉफी आल्याची माहितीही त्यांनी दिली. आपण मात्र अजून जडीबुटीतच अडकलो आहोत. आयुर्वेदातही नवनवीन संशोधन झाले पाहिजे, तरच त्याकडे लोक आकृष्ट होतील, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या