प्रचंड लाटा व वादळामुळे खोल समुद्रातील मच्छीमारांची गॉडवील बोट किनाऱ्यावर परतत असताना लाटांच्या तडाख्यात बोटीचा पंखा तुटला आणि बोट बंद पडली. या बोटीत 17 खलाशी आणि नाखवा होते. तब्बल 12 तास त्यांचा दर्याशी संघर्ष सुरू होता. याबाबत मेसेज देऊनही तटरक्षक दल, पोलीस यापैकी कोणत्याही यंत्रणेने दखल न घेता या खलाशांना मृत्यूच्या दाढेत सोडून दिले. त्यामुळे खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या 17 लाडक्या भावांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याने संताप व्यक्त होत आहे.
15 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली आहे. मासेमारीसाठी भाईंदरच्या उत्तन पातान बंदर येथील गॉडवील या मच्छीमार बोटीचे नाखवा अलेक्झांडर बेळू व इतर 16 जण हे मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मच्छीमार बोटींना किनाऱ्यावर परतण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार मासेमारीसाठी गेलेल्या बोटी परतू लागल्या. अलेक्झांडर यांची बोटदेखील किनाऱ्यावर परतण्यासाठी निघाली होती. मात्र लाटांच्या तडाख्यात बोटीचा पंखा तुटला. त्यामुळे बोट एकाच जागी थांबली. वादळी वाऱ्यामुळे बोट खवळलेल्या समुद्रात हेलकावे खात होती. याचदरम्यान मदर इंडिया नावाची बोटदेखील किनाऱ्यावर परतत असताना त्यांना ही बंद पडलेली बोट दिसली. त्यावेळी बोटचालकाने धाडस दाखवून त्या बंद पडलेल्या बोटीला रस्सीने बांधून ती बोट समुद्रकिनाऱ्यावर आणण्यास मदत केली. या बोटचालकाच्या धाडसामुळे बोटीत अडकलेल्या 18 जणांचा जीव वाचला व त्यांना सुखरूप बाहेर काढले.
कोस्ट गार्डचे दुर्लक्ष
बोट बंद पडल्याची माहिती कोस्ट गार्ड यांना देण्यात आली. मात्र त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यांनी या माहितीकडे दुर्लक्ष केले. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. खोल समुद्रात अडकलेल्या नौकेला कोस्ट गार्डने वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. अन्य मच्छीमारांनी बंद पडलेल्या बोटीला किनाऱ्यावर आणल्याची माहिती मच्छीमार नेते बर्नाड डिमेलो यांनी दिली.