मिंधे गटाला डोंबिवलीत मोठा धक्का बसला आहे. मिंधे गटाचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर शिवसेनेत प्रवेश केला आहे. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतली.
दीपेश म्हात्रे यांच्यासोबत त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले.
यावेळी ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आदित्य साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’, ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करू. ठाणे जिल्ह्यामध्ये साम, दाम, दंड, भेद वापरून पक्ष वाढवू आणि एकही कार्यकर्ता कुठेही जाणार नाही, असे वचन दीपेश म्हात्रे यांनी दिले. सत्तेत असतानाही आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले. महाराष्ट्र तोडण्याचे काम करतायत त्यांना सोडून तुमच्याकडे आलो असून महाराष्ट्र जोडण्याचे काम करणार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.