मोठ्या आवाजात गाणी लावून डॉक्टर्स घालत होते धिंगाणा, पोलीस पोहोचल्यावर झाली अशी अवस्था

उत्तराखंडमधील देहरादून येथील डॉक्टरांच्या वसतिगृहातला सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. वसतीगृहात  रात्री उशिरा डॉक्टर्स मोठ्या आवाजात गाणी लावून अर्धनग्न अवस्थेत नाचत होते. शेजाऱ्यांनी तक्रार करताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या डॉक्टरांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओ व्हायरल होताच, कॉलेज प्रशासनाने डॉक्टरांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांना वसतिगृहातून काढून टाकले.

मिळालेल्या माहितीनुसार, दून रुग्णालयाजवळच्या रस्त्यावर पीजी विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह आहे. तिथे रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी पार्टी करत धिंगाणा घालत होते. त्यांच्या मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे शेजाऱ्यांना त्रास होत होता. अशावेळी त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर विद्यार्थी अर्धनग्नावस्थेत नाचत होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमच्या माहितीनुसार, त्यावेळी डॉक्टर ड्यूटीवर नव्हते. मात्र तरी यासंदर्भात तपास सुरू असल्याचे प्राचार्य डॉक्टर गीता जैन म्हणाल्या.

कॉलेज प्रशासनाने ज्या पीजी डॉक्टरच्या खोलीत पार्टी झाली त्याला हॉस्टेलमधून काढून टाकले आहे. यासोबतच त्याच्यावर 10 हजारांचा दंड ठोठावला आहे, अन्य डॉक्टरांची ओळख पटवून त्यांनाही दंड ठोठावण्यात येणार आहे. दुसरीकडे, आरोग्य सचिव प्रदीप पंत यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, मोठ्या आवाजातील गाण्याच्या तक्रारीवरून पोलिस पोहोचले होते, ज्यावर डॉक्टरांनी पोलिसांशीही गैरवर्तन केले. त्या डॉक्टरांना इशारा देऊन सोडून देण्यात आले.