दिल्लीत भाजपकडून हजारो मतदारांची नावं वगळण्याचा कट, ‘आप’कडून तीन हजार पानांचे पुरावे सादर

दिल्लीत भाजपकडून हजारो मतदारांची नावं वगळण्याचा भाजपचा कट आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी आपने निवडणूक आयोगाकडे तीन हजार पानांचे पुरावे सादर केले आहेत.

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज आम्ही निवडणूक आयोगाला भेट दिली आणि भाजप कसे दिल्लीत कसे लोकांची मतं कापत आहेत त्याचा 3 हजार पानांचा पुरावा सादर केला आहे. गरीब आणि दलित मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली जात आहेत. सगळ्यांनाच या मतांची किंमत माहित आहे. शहादरा विधानसभा मतदारसंघातून 11 हजार मतदारांची नावं काढून टाकण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करत आहे हे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले.

निवडणुकीपूर्वी ही नावं काढू नका अशी आम्ही विनंती केली आहे. तसेच भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी ही नावं हटवण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. निवडणुकीपूर्वी ही नावं काढली जाणार नाही असे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे असे केजरीवाल यांनी सांगितले.