Delhi crime news – अखेर ‘दाऊद’ला बेड्या ठोकल्याच! दिल्ली पोलिसांचा थरारक पाठलाग अन् हाय-वेवरच आवळल्या मुसक्या

कानून के हाथ लंबे होते हैं… असे म्हणतात ते काही खोटे नसल्याचा प्रत्यय दिल्लीतील एका घटनेवरून आला आहे. दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग 48 वर जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या एका 21 वर्षीय माथेफिरूला बेड्या ठोकल्या आहेत. जीटी करनाल महामार्गावर हा माथेफिरू जीवघेणा स्टंट करत होता. विशेष म्हणजे स्कॉर्पिओच्या पाठीमागे ठळक अक्षरांमध्ये ‘दाऊद’ असे लिहिलेले होते.

दिल्ली पोलिसांनी ‘दाऊद’ला बेड्या घातल्या ही बातमी आली आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगू लागली. ही बातमी वाचून अनेकांना धक्काही बसला. पण हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नसून, दिल्लीतील स्टंटबाज दाऊद अंसारी आहे. ज्याच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

रविवारी 18 जानेवारी रोजी सायंकाळी जीटी करनाल महामार्गावर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने धुमाकूळ घातला होता. ही गाडी नागमोडी वळण घेत इतर वाहनांच्या मधून अत्यंत वेगाने जात होती. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीच्या मागील काचेवर मोठ्या अक्षरात ‘दाऊद’ असं लिहिलं होतं. हा स्टंट पाहून रस्त्यावरील इतर वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अखेर याची तक्रार तात्काळ पोलिसांकडे करण्यात आली.

पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई

महामार्गावर माथेफिरूचा जीवघेणा स्टंट सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. बाह्य-उत्तर जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त (DCP) हरेश्वर वी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. समयपूर बादली पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत नरेलाच्या दिशेने जाणाऱ्या या ‘दाऊद’चा थरारक पाठलाग केला आणि अखेर त्याला घेराव घालून गाडी थांबवण्यास भाग पाडले.

दरम्यान, ही स्कॉर्पिओ दाऊदचे वडील मुसाफीर अंसारी यांच्या नावावर आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याचे लायसन्स जप्त केले आहे. तसेच ती स्कॉर्पिओ गाडीही पोलिसांनी ओढून पोलीस ठाण्यात जमा केली आहे. या कारवाईचा व्हिडीओ शेअर करत पोलिसांनी रस्त्यावर स्टंटबाजी करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा दिला.