दिल्ली डायरी – बिहारमध्ये विजयाची तुतारी कोण फुंकणार?

>>नीलेश कुलकर्णी 

बिहार विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. त्याची प्रमुख तीन कारणे म्हणजे या निवडणुकीनंतर मोदी सरकार गडगडण्याची एक शक्यता वर्तविली जाते. दुसरे म्हणजे मतदार याद्यांच्या फेरपडताळणीनंतर (एसआयआर)  67 लाखांहून अधिक मतदार गाळल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक. तिसरे, ही निवडणूक सुशासन बाबूनितीश कुमारांची कदाचित शेवटची निवडणूक असेल. नितीशबाबूंनंतर बिहारचे प्राक्तन काय असेल? याचाही फैसला ही निवडणूक करेल 

 

बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्याची नामी संधी काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाकडे आहे. मात्र दोन्ही पक्षांत असणारा समन्वयाचा अभाव, तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्याचा त्यांच्या पक्षाचा आग्रह. राहुल गांधी यांचे त्यावरचे मौन यामुळे निवडणूक फसत चालली आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर एरवी उंटावरून शेळ्या हापून निवडणूक सल्लागार म्हणून काम करायचे. आता तेही प्रत्यक्ष निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांचा कितपत प्रभाव पडतो हे पाहण्यासारखे आहे. प्रशांत यांचा जनसुराज्य पक्ष व ओवेसींची एमआयएम हे दोन्ही पक्ष भाजपची ‘बी टीम’ म्हणून ओळखले जातात. त्यात आयकर खात्याने धाडी टाकल्याने प्रशांत किशोर हे भाजपविरोधात भूमिका घेत असले तरी ही भूमिका निकालानंतर कायम राहील काय? हेही पाहणे आवश्यक आहे. ‘बिहार मे फिरसे जंगलराज नही चाहिए’ असा प्रचार भाजप व प्रशांत किशोर…दोन्हींकडून जोरात सुरू आहे. त्यामुळे बिहारची निवडणूकही रंग बदलत चालली आहे.

बिहारमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल आरामात जिंकेल, असे एक महिनाभरापूर्वीचे चित्र होते. नितीश कुमार मानसिक आजाराने ग्रासलेले आहेत. त्यांचे सरकार व पक्षावर नियंत्रण नाही. जनता दलाचे अध्यक्ष संजय झा यांच्या माध्यमातून अमित शहा यांनी संपूर्ण पक्षच ‘टेक ओव्हर’ केलेला आहे. चिराग पासवान यांच्याकडे फारसे कमावण्या व गमावण्यासारखे नाही. त्यामुळे या स्थितीचा अचूक फायदा उठवत बिहारमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री बनविण्याचे महत्त्वाकांक्षी डावपेच टाकले जात आहेत. आम आदमी व ओवेसींचे सर्व जागांवर निवडणुका लढविणे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फाटाफूट करणारे आहे. ते भाजपच्या पथ्यावर पडेल. एसआयआरमधून वगळलेली मते ही काँग्रेसची मतपेढी असल्याने त्याचा फटकाही त्या आघाडीला बसू शकतो. भरीस भर म्हणून लालू यादवांचे ज्येष्ठ सुपुत्र तेजप्रताप यांनी नवीन पक्ष काढून शड्डू ठोकला आहे. लालूंना किडनी देणारी रोहिणी आचार्य ही कन्याही नाराज आहे. तेजप्रताप हे ‘करमणूकप्रधान’ पात्र असले तरी यादव मतांमध्ये ते फूट पाडू शकतात. लालू यादवही सध्या तब्येत व कुटुंबकलहाने ग्रस्त आहेत. त्यामुळेच ही निवडणूक नितीश कुमार व लालू या जयप्रकाश नारायणांच्या दोन शिष्योत्तमांतील अखेरची निवडणूक असेल. बिहारला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या नितीश बाबूंची ही अखेरची निवडणूक असेल. नितीश कुमारांनी राजकीय भूमिका स्वार्थासाठी अनेकदा बदलल्या असतीलही. मात्र बिहारला त्यांनी ‘निर्भय’ बनवले. नितीश कुमारांचे हे योगदान मोठेच. नितीश कुमारांनंतरचा बिहार कसा असेल? याचे उत्तर 14 नोव्हेंबरला कळेलच.

 

काँग्रेसचा सावळा गोंधळ

हरयाणातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा घोळ राहुल गांधी विदेशात असताना अखेर सोडवला गेला आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी ‘मैं बताऊंगा उसको ही, प्रदेशाध्यक्ष बनवाना पडेगा,’ असे खुले चॅलेंज काँग्रेस हायकमांडलाच दिले होते. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आजारी असताना व राहुल  दिल्लीबाहेर असताना सोनिया गांधी यांनी परिस्थिती काwशल्याने हाताळली. हुड्डा विरुद्ध सेलजा व रणदीप सुरजेवाला हे हरयाणाचे समीकरण आहे. पक्षातच दोन गटतट तयार करून त्यांना आपापसांत लढवायचे ही काँग्रेसची जुनी रणनीती आता पक्षाच्याच अंगलट येताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यातूनच हुड्डांसारखे पक्षाने सर्वकाही दिलेले नेते पक्षालाच आव्हान देताना दिसतात. याच हुड्डांच्या हट्टापोटी काँग्रेसने जिंकत आलेली हरयाणाची निवडणूक गमावली होती. तरीही पक्षाने त्यातून काही बोध घेतलेला दिसत नाही. आपल्या जागी कॅप्टन अजय यादव यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करा आणि मला विधिमंडळ पक्षाचा नेता करा, असा हेका हुड्डा यांनी अखेपर्यंत सोडला नाही. अखेरीस सोनिया गांधी व प्रियंका गांधींनी हा तिढा कसाबसा सोडवला. राव नरेंद्रसिंग यांची प्रदेशाध्यक्षपदी व हुड्डा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करून सुटकेचा श्वास सोडला. या दोन्ही नावांना सेलजा व सुरजेवाला यांनी अखेरपर्यंत विरोध केला. अखेरीस संयम संपलेल्या प्रियंका गांधी यांनी या दोघांची खरडपट्टी काढली व काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला. ज्या हुड्डांमुळे हरयाणा हातातले गेले, त्यांना त्याची किंमत मोजावी लागली नाही. उलट त्यांना ‘बक्षिसी’ दिली गेली, असा काँग्रेस जनांमध्ये गेलेला मेसेज पक्षाच्या काही हिताचा नाही हे नक्की!

 संघाचे शतक आणि मित्रपक्षांच्या शुभेच्छा

संघप्रणीत सरकार दिल्लीत सत्तेवर असल्याने संघाची शंभरी जोरात साजरी झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे हंगामी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ‘‘भाजप आता पुरती सक्षम झाली आहे. आम्हाला संघाची गरज नाही’’ असे विधान करून संघाची नाराजी ओढवून घेतली होती. नड्डा हे कणाहीन नेते आहेत. मोदी सांगतात, बोलतात तेच नड्डा करतात हे संघ धुरिणांनाही ठाऊक आहे. तिथून मोदी व संघातील संघर्ष अधिकच टोकाला गेला. मोदींना पंचाहत्तरीचे कारण सांगून नागपूरकर ‘रिटायर’ करणारच असे वातावरण तयार झाले. मात्र ऐन वेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी, ‘रिटायरमेंट की कोई सीमा नही होती,’ असे सांगत मोदींसकट स्वतःच्या खुर्चीवरचे संकट टाळले. त्यानंतर मोदी व भागवतांमध्ये अत्यंत प्रेमाचे संबंध निर्माण झाले. दोघांनीही एकमेकांना वाढदिवसाच्या व  संघ स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही बाजूंनी तलवारी म्यान झाल्यानंतर संघाची शंभरी दणक्यात व्हावी व तुम्ही सत्तेसाठी जे ‘हवशे गवशे नवशे’ यांना गोळा केले आहे, त्यांनाही यात सामील करावे, असे संघाने दिल्लीला सांगितले. त्याबरहुपूम दिल्लीतून आदेश निघाले. मग झाडून नितीशबाबू, चंद्राबाबू यांच्यासह देशभरातील भाजपच्या मित्रपक्षांनी संघाच्या शंभरीनिमित्त कौतुकाचा पाऊस पाडला. काही नेत्यांनी तर संघ संचलनावर फुले व आपट्याची पाने उधळली. ज्यांच्या कित्येक पिढय़ांनी संघाला प्रखरतेने विरोध केला, त्यांच्यावरच फुलांची उधळण करण्याची वेळ या पुढाऱ्यांवर आली. संघाने आपली शंभरी अशी गाजवली.

[email protected]