
>> नीलेश कुलकर्णी
एखाद्या थरार चित्रपटाला लाजवेल असे हरयाणातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रकरण घडले आहे. काँग्रेसने उपेक्षित समाजाच्या पूरन कुमार यांची बाजू घेतली आहे. हरयाणातील भाजपप्रणित सरकारने उघडपणे भूमिका घेतली नसली तरी संदीप कुमारच्या आत्महत्येचा वापर हे सरकार करत आहे. पूरन यांनी गंभीर आरोप केलेले हरयाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजित कपूर हे भाजपचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व अमित शहा यांचे खासमखास असल्यामुळे हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही.
हरयाणासारख्या छोटय़ा राज्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांमुळे (ज्या कुणी पाहिलेल्या नाहीत) खळबळ उडाली आहे. उपेक्षित समाजाचे आयपीएस पूरनकुमार यांनी आत्महत्या केली. त्यांनी त्यांच्या ‘ फायनल नोट’मध्ये राज्यातील काही आजी माजी प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले, जातीयवादामुळे आपली पिळवणूक झाल्याचेही सांगितले. पूरन यांच्या आत्महत्येने हरयाणा हादरले असतानाच या प्रकरणात संदीप कुमार नावाच्या जाट समाजाच्या एक सहाय्यक पोलीस निरीक्षकानेही आत्महत्या केली. संदीप यांनीही ‘फायनल नोट’मध्ये पूरनकुमार, त्यांच्या आयएएस पत्नी व कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
पूरन यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांच्या आयएएस पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत सरकारी दौऱ्यावर जपानमध्ये होत्या. त्या तत्काळ परतल्या. मात्र नऊ दिवस पूरनकुमार यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम झाले नव्हते. संदीप कुमार यांनी आत्महत्या केल्यावर पूरन यांच्या पत्नी अवनीत कुमार यांनी त्यासाठी परवानगी दिली. आता या अवनीत यांच्याविरोधातच एफआयआर दाखल झाला आहे. पूरन व संदीप यांची आत्महत्या करण्याची ‘पद्धत’ एकच आहे. त्यांनी गोळी झाडल्याचे कोणीही ऐकले नाही! तसा प्रत्यक्षदर्शी कोणीही पुढे आलेला नाही. पूरन यांनी आठ पानांची तर संदीप कुमार यांनी चार पानांची फायनल नोट लिहिलेली आहे. एखाद्या ‘स्क्रिप्ट’प्रमाणे सगळे घडले.
पंतप्रधान मोदींचे ‘खिचडीमित्र’ म्हणून कोणाच्या ध्यानीमनी नसताना मनोहरलाल खट्टर हे हरयाणाचे मुख्यमंत्री बनले. तब्बल नऊ वर्षे खट्टर हे मुख्यमंत्री होते. या कार्यकाळात त्यांनी आपल्या ‘जातभाई’ असणाऱ्या पंजाबी अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंगज् दिल्या. शत्रुजित कपूर हे या पंजाबी कनेक्शनमधून खट्टरांचे खासमखास बनले. दिल्लीची ‘सॅटेलाईट सिटी’ असणाऱ्या गुरुग्रामसह हरयाणातून भाजपला पैशांचा मलिदा पोहोचविण्याची जबाबदारी या शत्रुजित यांच्यावर असायची, अशी चर्चा त्या काळी रंगायची. अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा हात डोक्यावर असल्याने शत्रुजित यांनी हरयाणात उच्छाद मांडला. भ्रष्ट विजय दहिया व अन्य एका आयएएस अधिकाऱ्याला तुरुंगात डांबले. हरयाणात शत्रुजित यांच्या नावाची दहशत निर्माण झाली. या निरंकुश सत्तेतूनच पूरन कुमारचे आत्महत्या प्रकरण घडले. त्यांच्या फायनल नोटमध्ये शत्रुजित यांचे नाव आल्यामुळेच संदीप कुमार यांना ‘शहीद’ व्हावे लागले काय? अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. पूरन यांच्या आत्महत्येचे प्रकरण आपल्यावर शेकू नये, यासाठी संदीप कुमार यांचे आत्महत्या प्रकरण उभे केल्याचा संशय व्यक्त होतो आहे. पूरन यांच्या पत्नी अवनीत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातमध्ये संजीव भट्ट या आयपीएस अधिकाऱ्याच्या नशिबीही अशा नरकयातना जिवंत असताना आल्या होत्या. त्यांच्या पत्नीलाही त्या भोगाव्या लागल्या होत्या. मोदी-शहा यांच्या निरंकुश सत्तेला विरोध करणे संजीव भट्ट यांना महागात पडले होते. हरयाणात त्याचीच दुर्दैवाने पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
न्यायदेवता ‘मेहेरबान’
आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणातील एक आरोपी माजी पेंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे खासदार चिरंजीव कार्ती चिदंबरम यांच्यावर न्यायदेवता सध्या मेहरेबान झालेली आहे. कार्ती यांना न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय विदेशात जाण्याची खुली सूट न्यायालयाने दिली आहे. न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी करता येणार नाही. मात्र न्यायालयाने न्याय देताना साधलेले ‘टायमिंग’ लाजवाब आहे. कार्ती यांचे पिता पी. चिदंबरम सध्या उठताबसता काँग्रेस सरकारातल्या चुकांचा पाढा वाचत आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्लानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची आपली तयारी होती. मात्र पक्षनेतृत्व आणि सरकारने त्यात रस दाखविला नाही, असा आरोप करण्याची ‘जाग’ चिंदबरम यांना सतरा वर्षांनंतर आली. बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर चिदंबरम यांनी आपला तोंडाचा पट्टा सुरू केला आहे. इंदिरा गांधी यांनी अमृतसरमधील गुरुद्वारामध्ये खलिस्तानींविरोधात केलेले ‘ऑपरेशन’ हे चुकीचे पाऊल होते, याचाही साक्षात्कार चिदंबरम यांना नुकताच झाला आहे. चिदंबरम हे भाजपला पूरक व काँग्रेसला अडचणीत आणणारी भूमिका घेत आहेत. तेव्हा या पिता-पुत्रावर मायबाप सरकारला मेहरबानी करावी लागणारच आहे.
बिहारसाठी भाजपच्या मुख्यमंत्र्याचे दल
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना बिहारच्या प्रचाराला भाजपने जुंपले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्वी बिहारचे प्रभारी होते, त्यामुळे त्यांना बिहारच्या चकरा माराव्या लागत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता जिथे पंजाबीबहुल समुदाय आहे तिथे प्रचार करत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे यादव समाजाला भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ तसे दिल्लीकरांचे नावडते. मात्र, बिहार निवडणुकीत राजपूत मतदारांच्या नाराजीचा फटका बसेल, हे ध्यानात आल्यानंतर योगींसाठीही भाजपने पायघडय़ा घातल्या आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय हेदेखील प्रचारासाठी फिरत आहेत. एकूणात भाजपने झाडून सगळे कामाला लावलेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून पक्षीय धोरणाच्या बाबतीत अडगळीत टाकलेल्या नितीन गडकरींचे नावही यावेळी ‘स्टार प्रचारकां’च्या यादीत आहे. पेंद्रीय मंत्री म्हणून गडकरींची कामगिरी सर्वात प्रभावी असली तरी मोदींनीच गडकरींची पेंद्रीय निवडणूक समितीतूनही गच्छंती केली होती. मात्र असे असतानाही गडकरींचे प्रचाराचे ‘स्टार’ चमकले! याचे प्रमुख कारण म्हणून संघ व मोदी यांच्यात झालेला समेट हे सांगितले जात आहे. गेल्या 11 वर्षांत विजनवास भोगणाऱ्या गडकरींच्या प्रचाराचे स्टारही यामुळेच चमकले आहेत.