
>> नीलेश कुलकर्णी
कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्री पदाचा संघर्ष अंतिम टप्प्यात आलेला दिसत आहे. सिद्धरामय्या यांच्या चिरंजीवांनी कर्नाटकात ‘नोव्हेंबर क्रांती’ होईल असे म्हटले आहे. ही क्रांती तेथे खरेच घडणार काय? बिहारमधील निकालानंतर तेथे ‘ऑपरेशन कमळ’ होणार काय? असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत.
कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी एकमेकांविरोधात समशेरी काढलेल्या आहेत. आपण मुख्यमंत्रीपद सोडणार नाही, असे स्पष्ट करत सिद्धरामय्यांनी शिवकुमार यांना डिवचले आहे. त्यातच सिद्धरामय्यांचे चिरंजीव यतींद्र यांनी ‘‘सिद्धरामय्या हे राजकीय आयुष्याची शेवटची इनिंग खेळत आहेत. ही त्यांची मुख्यमंत्रीपदाची अखेरची टर्म आहे. त्यानंतर 2028 मध्ये सतीश जरकीहोळी हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील’’, असा दावा करून शिवकुमार यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे आता शिवकुमार काय करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्याची सिद्धरामय्या यांची योजना आहे. फेरबदलामध्ये शिवकुमार यांना सीएम करा, अशी मागणी करणाऱ्या मंत्र्यांना नारळ देऊन सत्तेवरची आपली मांड पक्की करण्याचा सिद्धरामय्यांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला व हायकमांडने सिद्धरामय्यांच्या पारड्यात वजन टाकले तर शिवकुमार बंड करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. सिद्धरामय्यांच्या चिरंजीवांनी ‘‘कर्नाटकात ‘नोव्हेंबर क्रांती’ होईल’’ असे म्हटले आहे. ती क्रांती असेल की बंड, हे यथावकाश कळेलच. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गृहराज्यातील सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाला डोळ्यांत तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे हे नक्की!
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांना एव्हाना आपण इतक्या सहजासहजी मुख्यमंत्री होणार नाही याची कल्पना आली आहे. त्यात त्यांच्यावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’ला उकळी फुटल्याचे मानले जात आहे. सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचे काँग्रेस नेतृत्वाचे सुरुवातीचे नियोजन होते. मात्र, सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यातच ते बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सिद्धरामय्यांना मुख्यमंत्रीपदावरून काढल्यास या समाजात चुकीचा संदेश जाईल, ही भीती काँग्रेस नेतृत्वाला आहे.
कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमधील संघर्ष ‘तिहेरी’ आहे. मुख्यमंत्रीपदासाठी योग्यता असूनही मल्लिकार्जुन खरगे यांना कर्नाटकातील लिंगायत – वक्कलिंगांच्या प्रभावशाली राजकारणामुळे संधी मिळाली नव्हती. आपली ही खंत दूर करून आपले चिरंजीव प्रियांक यांना मुख्यमंत्री करण्यासाठी खरगेच पडद्याआडून खेळी करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कर्नाटक काँग्रेसमधील सत्तासंघर्ष आता वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. मुख्यमंत्रीपद सोडावे लागलेच तर त्या पदावर सतीश जरकीहोळी यांना बसविण्याचा विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा ‘प्लॅन’ आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खरगेंसह शिवकुमारही अस्वस्थ झाले आहेत. बिहारचा निकाल भाजप व मित्रपक्षाच्या बाजूने लागल्यास कर्नाटकातील ‘ऑपरेशन कमळ’ला चालना मिळेल. बिहारमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यावर मात्र ही मोहीम थंड पडू शकते. मात्र, दिल्लीतल्या काँग्रेस जनांनी कर्नाटकचा विषय गांभीर्याने घ्यावा, नाहीतर देशातील एक महत्त्वाचे राज्य त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे.
भोजपुरी कलाकारांचा बोलबाला
बिहार विधानसभा निवडणुकीत भोजपुरी कलाकारांना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपने तर झाडून भोजपुरी कलाकार गोळा करून त्यांना बिहारमध्ये पाठवले आहे. गायिका मैथिली ठापूरला तर थेट विधानसभा निवडणुकीतच उतरवले आहे. मैथिलीचा तसा बिहारशी दूरदूरचा संबंध नाही तरीदेखील अनेक निष्ठावंतांचे बळी चढवत मैथिलीला तिकीट देण्यात आले आहे. बिहारच्या निवडणुकीसाठी पक्षाने खासदार मनोज तिवारी तसेच गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनाही बिहारमध्ये धाडले आहे. वादग्रस्त भोजपुरी कलाकार पवनसिंग यांनाही भाजपने ‘पावन’ केले आहे. आझमगढमधून लोकसभा पोटनिवडणुकीतून निवडून आलेले दिनेश यादव निरहुआ यांनाही पक्षाने बिहारची जबाबदारी दिली आहे. निरहुआ यांच्याबरोबरच आम्रपाली दुबे व अक्षरा सिंग या महिला कलाकारांकडेही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भोजपुरी कलाकारांना गोळा करण्याच्या बाबतीत तरी भाजपने इतर पक्षांवर पुरघोडी केली आहे. राजदची मदार मशहूर गायक खेसरीलाल यादव व गणेश यादव यांच्यावर आहे. भाजपने भोजपुरी कलाकारांची मांदियाळी बिहारमध्ये उतरवली असली तरी हे ‘स्टार’ पक्षाला कितपत मते मिळवून देतात हे यथावकाश कळेलच!




























































