
दिल्लीत इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) खरेदी करण्याची योजना बनवणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा मिळणार आहे. दिल्ली सरकार लवकरच ईव्ही पॉलिसी 2.0 घेऊन येणार आहे. या पॉलिसीअंतर्गत नव्या ईव्ही खरेदीसोबतच जुन्या पेट्रोल आणि डिझेल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये बदलल्यास दिल्ली सरकार 50 हजार रुपये आर्थिक मदत देणार आहे.
एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत कमीत कमी 3 टक्के वाहनांना रेट्रोफिट करून क्लिन एनर्जीकडे घेऊन जाण्यासाठी पावले टाकली जात आहे. याअंतर्गत ईव्ही पॉलिसी 2.0 अंतर्गत अनेक सबसिडी आणि इन्सेटिव्ह आणण्याची तयारी केली जात आहे. ईव्ही पॉलिसी 2.0 मध्ये 10 वर्षे जुनी डिझेल आणि 15 वर्षे जुनी पेट्रोल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये बदलल्यास 50 हजार रुपयांचा इन्स्टेटिव्ह देण्याचा प्रस्ताव आहे. सध्या कोणत्याही जुन्या कारला इलेक्ट्रिकमध्ये बदलल्यास जवळपास दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो, परंतु सरकारने 50 हजार रुपयांची मदत केल्यास थोडा दिलासा मिळू शकतो. या पॉलिसीअंतर्गत सुरुवातीला 1 हजार कारला रेट्रोफिटिंगसाठी इन्सेंटिव्ह देण्याचा प्रस्ताव आहे. चारचाकी वाहनांसोबत सरकार दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांनासुद्धा प्रोत्साहन देण्याची तयारी करत आहे. ईव्ही पॉलिसीअंतर्गत सुरुवातीला 1 लाख इलेक्ट्रिक दुचाकीवर 30 हजार रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाण्याची शक्यता आहे.
सबसिडीसाठी अटी काय?
सरकारकडून सबसिडीसाठी काही अटी घातल्या जाऊ शकतात. 25 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत इलेक्ट्रिक कारवर सबसिडी मिळण्याची शक्यता आहे. 25 लाख रुपयांपेक्षा महाग, लक्झरी इलेक्ट्रिक कारवर सबसिडी दिली जाणार नाही, असे म्हटले जात आहे. सुरुवातीला 25 हजार इलेक्ट्रिक कारला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.




























































