
दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान माघारी वळवण्यात आले. सदर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तांत्रिक समस्येमुळे दिल्ली विमानतळावरील पार्किंग बेमध्ये विमान परत नेले, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. एअर इंडियाचे विमान एआय 2017 दिल्लीहून लंडनला जाणार होते. आमच्या प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
विमानात तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास येताच वैमानिकांने उड्डाण रद्द करत माघारी वळवण्याचा निर्णय घेतला. यानंतर मानक ऑपरेटिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि खबरदारीच्या तपासणीसाठी विमान पार्किंग बे मध्ये नेले असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. प्रवाशांना लवकरात लवकर लंडनला नेण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. एअर इंडियाचा ग्राउंड स्टाफ प्रवाशांची काळजी घेत आहेत.