
जगभरात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारला (ईव्ही) मागणी दिसून येत आहे. हिंदुस्थानातही इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढताना दिसत आहे. निती आयोगाच्या नव्या अहवालात ईव्ही इंडस्ट्रीची सद्यस्थिती आणि भविष्यातील शक्यता यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ईव्ही गाडय़ांमध्ये कोणत्या राज्यांनी आघाडी घेतली आहे, याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालानुसार, दिल्ली, महाराष्ट्र, चंदिगड अशा देशातील 10 राज्यांनी आपले सक्रिय धोरण, पायाभूत सुविधा यांच्या जोरावर इलेक्ट्रिक गाडय़ांमध्ये बाजी मारलीय. 2030 मध्ये 30 टक्के ईव्ही लक्ष्य गाठण्यात ही राज्ये महत्त्वाची भूमिका साकारतील.
नुकतीच एलन मस्कच्या टेस्लाची हिंदुस्थानात एंट्री झाली. टेस्लाने मुंबई आणि दिल्लीत शोरूम सुरू केले आहेत. देशात टाटा, महिंद्रा, ह्युंदाई, सुझुकी यासारख्या कंपन्यांनी ईव्ही मार्केटमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
निती आयोगाच्या अहवालानुसार, सार्वजनिक चार्ंजग पॉइंट उपलब्ध करण्यात दिल्ली, महाराष्ट्र, चंदिगड पुढे आहे. मजबूत धोरण, चार्ंजग इन्फ्रास्ट्रक्चर, पब्लिक ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिफिकेशनमध्ये ही राज्ये सर्वात पुढे आहेत. कर्नाटक, तामीळनाडू, हरयाणा ही राज्ये ईव्ही रिसर्च, नवसंकल्पना, उत्पादनांमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. हरयाणा, कर्नाटक, लडाख, हिमाचल प्रदेश चार्ंजग इन्फ्रास्ट्रक्चरच्या तयारीत टॉपवर आहेत.