
शिख्स फॉर जस्टिस (एसएफजे) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्यावर 26 जानेवारीपूर्वी दिल्लीत अशांतता भडकवण्याचा आणि देशविरोधी कट रचल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी पन्नूविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने खलिस्तानी दहशतवादी संघटना सिख्स फॉर जस्टिस (एसएफजे) चे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्याविरुद्ध नवीन FIR दाखल केला आहे. ही कारवाई पन्नू यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओनंतर केली आहे. या व्हिडीओत त्यांने २६ जानेवारीपूर्वी दिल्लीत अशांतता भडकवण्याची धमकी दिली होती. हिंदुस्थानविरुद्ध कट रचणे आणि देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचे आरोप पन्नूवर आहेत.
स्पेशल सेलने IPC च्या कलम १९६, १९७, १५२ आणि ६१ अंतर्गत पन्नूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पन्नूने व्हिडिओमध्ये दावा केला आहे की त्याच्या स्लीपर सेलने दिल्लीतील रोहिणी आणि डाबरी भागात खलिस्तान समर्थक पोस्टर्स लावले होते. मात्र, दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने केलेल्या शोधमोहिमेत आतापर्यंत असे कोणतेही पोस्टर्स सापडलेले नाहीत.
दिल्ली पोलिसांनी पन्नूविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये प्रामुख्याने कलम १५२ (भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणे) आणि ६१ (गुन्हेगारी कट) समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, कलम १९६ आणि १९७ लावण्यात आले आहेत, जे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि राष्ट्रीय अखंडतेला प्रतिकूल विधाने करणे याशी संबंधित आहेत.
अलीकडील व्हिडिओ संदेशात पन्नू यांनी दिल्लीतील रोहिणी आणि डाबरी सारख्या निवासी भागात खलिस्तान समर्थक पोस्टर्स लावण्याबद्दल बोलले होते. दहशतवादी संघटनेने दावा केला होता की त्यांचे स्लीपर सेल राष्ट्रीय राजधानीत सक्रिय आहेत. या माहितीनंतर, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने त्या भागात शोध घेतला, परंतु पोलिसांना आतापर्यंत कोणतेही आक्षेपार्ह पोस्टर्स किंवा साहित्य सापडलेले नाही. मानसिक दबाव निर्माण करण्याचा हा पन्नूचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.



























































