उमर खालिदला न्यायालयाचा दिलासा, जामीन केला मंजूर

दिल्ली दंगली प्रकरणातील आरोपी आणि जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन १६ ते २९ डिसेंबरपर्यंत देण्यात आला आहे. जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. न्यायालयाने अशी अट घातली आहे की, उमर या काळात सोशल मीडियाचा वापर करणार नाही आणि फक्त कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांनाच भेटू शेकेल.

जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याला १६ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत काही अटींवर २०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या दोन जामीनदारांवर अंतरिम जामीन मंजूर करण्यात येत आहे. न्यायालयाने म्हटले की, जामिनाच्या कालावधीत उमर त्याच्या घरी किंवा लग्न समारंभ होणाऱ्या ठिकाणी राहील. उमर खालिदने १४ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत जामीन मागितला होता. त्याच्या बहिणीचे लग्न २७ डिसेंबर रोजी आहे.

दरम्यान, फेब्रुवारी २०२० मध्ये नागरिकत्व (सुधारणा) कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात झालेल्या निदर्शनांच्या वेळी दिल्लीत हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात ५३ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या हिंसाचाराचे मास्टरमाइंड असल्याच्या आरोपाखाली खालिद, इमाम आणि इतर आरोपींवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा आणि पूर्वीच्या भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.