तर लोकशाही धोक्यात आहे, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांची टीका

जोपर्यंत माजी राष्ट्रपती जगदीप धनखड सार्वजनिकरित्या दिसत नाही तोवर आम्ही प्रश्न विचारत राहणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच लोकशाहीबद्दल बोलणाऱ्याला व्यक्तीला अशा पद्धतीने गायब केले जात असेल, तर माझ्या मते देशाची लोकशाही धोक्यात आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशातील खासदार उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करतात, मग ते लोकसभा असो किंवा राज्यसभा. काल पंतप्रधान या मॉक सेशनला उपस्थित होते. आज आमचे खासदार मॉक सेशनला उपस्थित राहतील. उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीसाठी, राष्ट्रीय हितासाठी होत आहे. आपल्या माजी उपराष्ट्रपतींचं काय झालं, कुठे आहेत हे मला ठाऊक नाही. जोपर्यंत श्री. धनखड सार्वजनिकरीत्या समोर येत नाहीत किंवा जनतेसमोर दिसत नाहीत, तोपर्यंत आम्ही हा प्रश्न विचारत राहू की आपले माजी उपराष्ट्रपती कुठे आहेत? हे लक्षात घेऊन देशातील सर्व खासदारांनी मतदान करावे असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

तसेच जर लोकशाहीबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीने गायब केले जात असेल, तर माझ्या मते देशाची लोकशाही धोक्यात आहे. आज भाजपकडे बहुमत नाही, हे लक्षात घेऊन खासदारांनी देशाच्या जनतेला काय हवे आहे आणि त्यांच्या स्वतःच्या अंतरात्म्याला काय हवे आहे हे विचार करून मतदान करावे असेही संजय राऊत म्हणाले.