
हिंदुस्थानात आजही एकत्र कुटुंब पद्धती ही प्रामुख्याने पाहायला मिळते. आपल्याकडे प्रामुख्याने एकत्र कुटुंबात राहण्याचा कल पाहायला मिळते. परंतु अलीकडेच एका सर्वेक्षणातून धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अंतर्गत जर शिकूनही मुले बेरोजगार असतील तर, पालकांमध्ये नैराश्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. ही महत्त्वाची माहिती ‘लॉन्जिट्युडिनल एजिंग सर्व्हे ऑफ इंडिया’च्या आकडेवारीतून मिळाली आहे. हे सर्वेक्षण हिंदुस्थानातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०१७-१८ मध्ये केले होते, ज्यामध्ये ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ७३,००० हून अधिक लोकांकडून माहिती गोळा करण्यात आली.
स्वीडनमधील उमेआ विद्यापीठाच्या संशोधकांनी या आकडेवारीचा सखोल अभ्यास केला. ‘सोशल सायन्स अँड मेडिसिन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, मुलांच्या बेरोजगारीमुळे पालकांना नैराश्य येण्याचा धोका अंदाजे ३.१४ टक्क्यांपासून ते १२.४८ टक्क्यांपर्यंत वाढतो. ज्या कुटुंबांमध्ये पालक त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी पूर्णपणे मुलांवर अवलंबून असतात, तिथे हा धोका आणखी जास्त असतो.
या संशोधनातून एक अनोखा सांस्कृतिक पैलू देखील समोर आला आहे. हिंदुस्थानात आपला मुलगा किंवा मुलगी वृद्धापकाळात आई वडिलांचा आधार बनेल. असा समज फार खोलवर रुजला आहे. परंतु मुले शिकूनही त्यांना नोकरी मिळत नाही हे प्रमाण आता फार वाढताना दिसत आहे. अशावेळी नोकरी जाते, तेव्हा पालकांना नैराश्य येण्याचा धोका अधिक असतो. मुलाकडून असलेली ही अपेक्षा पालकांच्या भावनिक आरोग्यावर थेट परिणाम करते.

























































