
ब्रिटिश सरकारने बांधलेल्या विविध उड्डाणपुलांची कामे दर्जेदार होती. ते पूल 100 वर्षांपेक्षाही जास्त कालावधी झाल्यामुळे पाडण्यासाठी तेथून आमच्या पीडब्ल्यूडी विभागाला पत्रव्यवहार केला जातो. अशा प्रकारची कामे सध्या बघायला मिळत नाहीत. मात्र दुर्दैवाने आता पूल पडताहेत, आम्हालाही कळत नाही. पूल पडला-पडला असे टीव्हीवर आम्ही पाहतो. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना आपल्या इमारती, पूल का पडताहेत, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित करून निकृष्ट बांधकामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
पीएसईए (प्रोफेशनल स्ट्रकचरल इंजिनीअरर्स असोसिएशनच्या) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘कोणत्याही ठिकाणच्या इमारती मजबूत झाल्या पाहिजेत. आता आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था होत असताना, आपल्या इमारती, पूल पडताहेत, मग ते लोक हुशार होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मावळात पूल पडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता सर्वच ठिकाणच्या पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित संस्थेच्या माध्यमातून भावी इंजिनीअरिंगला दिशा मिळावी, त्यांचे काम संस्थेच्या माध्यमातून होण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. राजकीय जीवनात मी 35 वर्षांत अनेक बांधकामे केली. मी अनेक साखर कारखाने उभे केले आहेत. त्यामध्ये स्ट्रक्चल इंजिनीअरिंगचा मोठा वाटा असल्याचेही पवार यांनी सांगितले.