
अजितदादांसाठी बारामती आईप्रमाणे होती. बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादांसाठी पांडुरंग होता. बारामतीकरांच्या विकासासाठी आणि अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे दुःखही तळघरात कोंडले आणि अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकरांकडे बघूनच आला आहे. तुमचे प्रेम, तुमचा पाठिंबा आणि तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी आयोजित पक्षाच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार बोलत होत्या. बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी आर्ज आज दाखल करत आहे. बारामतीत अशा पद्धतीने पोटनिवडणूक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. दादा आपल्यात नाहीत असे अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्यही नाही. पण नियतीने माझ्यावर, आपल्यावर ही वेळ आणली आहे. ही केवळ निवडणूकच नाही, तर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची खरी संधी असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, आदिती तटकरे, नरहरी झिरवळ, सना मलिक, पार्थ व जय पवार आदी उपस्थित होते.
बारामतीची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही
पवारसाहेबांनी बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला आणि अजित दादांनी त्यात रंग भरले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही, असे वचन मी बारामतीकरांना देते. त्यांचा विकासाचा विचार पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. ते शब्दाला जागणारे होते. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. त्यांना साक्षीला ठेवूनच मी तुम्हाला हे वचन देते, असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.





























































