Ajit Pawar News – तुम्ही वेडे आहात, संदीप क्षीरसागर यांच्या भेटीच्या प्रश्नावर अजित पवार पत्रकारांवर भडकले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तेव्हा पत्रकारांनी अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा तुम्ही वेडे आहात अशा शब्दात अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच मी बीडचा पालकमंत्री आहे, बीडमध्ये अनेक दिवस पाणी आले नव्हते त्यासाठी संदीप क्षीरसागर भेटायला आले असे अजित पवार म्हणाले.

जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अजित पवार आले होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांना संदीप क्षीरसागर यांच्या भेटीबद्दल विचारणा केली. संदीप क्षीरसागर यांची भेट झाली त्यांच्यासोबत काय चर्चा झाली असे पत्रकारांनी विचारले. तेव्हा अजित पवार म्हणाले की, तुम्ही ना इतके वेडे आहात. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मला विरोधी पक्षांचे नेते भेटायला येतात. मी जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, त्यांना मी भेटायला जात. आता बीडचे पालकमंत्रीपद माझ्याकडे आहे. बीडमध्ये गेली 21 दिवस पाणी नाहिये, संदीप क्षीरसागर यांनी हा प्रश्न मांडला त्यावर मी उपाययोजना केल्या आहेत असेही अजित पवार म्हणाले.