
नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानपरिषदेत महिलांसाठी मोठे निर्णय जाहीर केले. मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ (लवकर या, लवकर जा) ही महत्त्वाची सवलत देण्याची घोषणा त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात केली.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत की, “महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर “कम अर्ली-गो अर्ली” या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९. ४५ या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील, तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची, म्हणजेच सुमारे ३० मिनिटांची सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.”
त्या म्हणाल्या की, “त्याचप्रमाणे हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्गत जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १४ मोहिमा राबवून ४२ हजार ५९४ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच ऑपरेशन शोध मोहिमेतून ५ हजार ६६ महिला आणि २ हजार ७७१ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘मिसिंग सेल’ कार्यरत असून महिलांच्या समस्यांसाठी ५१ ‘भरोसा सेल’ कार्यान्वित करण्यात आले आहेत.”
सुनेत्रा पवार पुढे म्हणल्या की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’, ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजना राज्य सरकार प्रभावीपणे राबवत आहे. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम राबवण्यात येत असून बचत गटांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

























































