
मुंबईत उभारली जाणारी घरे सर्वसामान्यांना परवडणारी असावीत यासाठी सरकारने गेली दहा वर्षे बिल्डरांना वारेमाप सवलती दिल्या. बिल्डरांच्या संघटनांनी केलेल्या मागण्यांना झुकते माप दिले गेले. मात्र त्यानंतरही घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या नाहीत. पिढय़ान्पिढय़ा मुंबईत राहणाऱ्या लोकांकडेही आज स्वतःचे हक्काचे घर नाही. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर कार्यक्रमात संताप व्यक्त केला. मुंबई झोपडपट्टीमुक्त करणे आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे ही उद्दिष्टे अशा विकासकांमुळे पूर्ण झालेली नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बिल्डरांच्या संघटनांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर बिल्डरांकडून सवलती मागितल्या जातात. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत सरकारने बऱ्याच सवलती दिल्या, प्रीमियम कमी करून दिला तरीही मुंबईतील घरांच्या किमती कमी झाल्या नाहीत, असे मुख्यमंत्री फडणवीस क्रेडायच्या कार्यक्रमात म्हणाले. अटल सेतू व अन्य प्रकल्पांची उदाहरणेही त्यांनी या वेळी दिली. या प्रकल्पांलगतच्या घरांच्या किमती कमी होण्याऐवजी गगनाला भिडल्या आहेत, असे ते म्हणाले. एसआरएच्या योजना एका वर्षात पूर्ण करा आणि विक्रीसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये परवडणारी घरे बांधा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.