
मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मोक्याच्या भूखंडावर मध्यवर्ती कार्यालयाच्या पुनर्बांधणी योजनेंतर्गत खासगी विकासकाचा बहुमजली टॉवर उभा राहणार आहे. त्या अनुषंगाने परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने मध्यवर्ती कार्यालयाच्या पुनर्विकास प्रक्रियेला गती दिली आहे. पुढील महिनाभरात म्हणजे मार्च अखेरीपूर्वी खासगी विकासकाच्या निवडीसाठी निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. नव्या इमारतीत एसटीच्या कार्यालयांना काही जागा मिळणार आहे. मात्र उर्वरित मोठय़ा प्रमाणावर जागा खासगी विकासकाला व्यावसायिक अर्थाने ‘मोकळे रान’ ठरणार आहे.
महायुती सरकारने सत्तेत आल्यापासून मोक्याच्या भूखंडांवर डोळा ठेवला आहे. एसटी महामंडळाचे राज्य पातळीवरील मध्यवर्ती कार्यालय असलेली मुंबई सेंट्रल येथील जागाही मोक्याच्या भूखंडापैकी एक आहे. हजारो कोटींचा भाव असलेल्या या भूखंडाचा व्यावसायिक हेतूने वापर केला जाणार आहे. एसटीची मध्यवर्ती कार्यालयाची इमारत 60 वर्षांहून अधिक जुनी आहे. या इमारतीचा सार्वजनिक-खासगी तत्त्वावर (पीपीपी) पुनर्विकास करण्याची योजना परिवहन विभागाने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत भाडेपट्टा कालमर्यादा 49 वर्षे + 49 वर्षे अशी 98 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मध्यवर्ती कार्यालयाची जागा 98 वर्षांच्या भाडेतत्वावर खासगी विकासकाला दिली जाणार आहे. विकासकाला एसटीच्या जागेवर बहुमजली टॉवर उभारता येणार आहे. त्यातील काही मोजकी जागा एसटीच्या कार्यालयांसाठी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे, उर्वरित मोठय़ा प्रमाणावर जागा विकासकाला व्यावसायिक हेतूने वापरण्यास मुभा मिळणार आहे.
15 दिवसांत धोरणाला अंतिम स्वरूप देणार
मध्यवर्ती कार्यालयाच्या पुनर्बांधणी धोरणाला येत्या 15 दिवसांतच अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. या अवधीत धोरण आणि निविदा संच सरकारकडे तसेच विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या 15 दिवसांत निविदा खुल्या केल्या जातील. नंतर सल्लागार प्रकल्प व्यवस्थापकाची नियुक्ती केली जाईल. पुढे प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास केला जाईल. आगामी तीन वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

























































