फडणवीसांच्या काळात ‘वर्षा’वर गुंडांचा वावर! बाळासाहेब थोरात यांनी तोफ डागली

939

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडांना भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत, असा हल्लाबोल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.फडणवीस यांनी राजकारणातील गुंडगिरीवर टीका करणारे आणि त्या टीकेचा रोख काँग्रेसवर असणारे ट्विट केले आहे. फडणवीस यांच्या या ट्विटला महसूलमंत्री थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून सत्ताकाळात मुन्ना यादवसारख्या गुंडाची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारीबाबत बोलू नये, असे थोरात यांनी सुनावले आहे.

थोरात यांनी ट्विटरवर फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची सवय सोडावी असे बजावले असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी ‘भारतरत्न’ स्व. इंदिराजी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी करू नये, असे खडे बोलही थोरात यांनी सुनावले आहेत.
इंदिराजींनी करीम लालासह हाजी मस्तान, युसूफ पटेलसारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या याची आठवणही थोरात यांनी फडणवीस यांना करून दिली आहे.फडणवीस यांनी तातडीने ट्विटरवर खुलासा केला असून मी अंडरवर्ल्डला कधीही पाठीशी घातलेले नाही. मुन्ना यादव नागपूर महापालिकेवर तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते, असा दावा त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या