फडणवीस म्हणाले; मुंबईनेच माझी मराठी सुधारली, नाहीतर ‘का बे’, ‘साल्या’मधेच अडकलो होतो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी आल्या. मी त्यावेळी शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ अशी ‘सांस्कृतिक’ मराठी बोलत होतो. मुंबईच्या संस्कृतीनेच माझी मराठी सुधारली, नाहीतर ‘का बे’, ‘साल्या’मधेच अडकलो होतो, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठी भाषा दिनी विधान भवनात आयोजित कार्यक्रमात सांगितली तेव्हा सभागृहात हास्यकारंजी उडाली. पुण्यात तर माझ्या भाषेने मला बहिष्कृत केले असते, असे मुख्यमंत्री म्हणताच सर्वजण खदखदून हसले.

विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार व विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील प्रमुख नेत्यांनी आपले विचार मांडले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या वैदर्भीयन स्टाईलमध्ये केलेल्या कोटय़ांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मराठी भाषेचा गौरव करताना आपण आपली भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

नेतेमंडळी हल्ली घाबरतघाबरत विनोद करतात

विधिमंडळ हे विनोदांना जन्म देणारे ठिकाण आहे. पूर्वी विधानमंडळात भाषणांमध्ये विनोद, कोट्या , व्यंग अशा अनेक छटा पाहायला मिळायच्या. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांमध्ये एकमेकांवर केलेल्या कोट्या, त्यातून निर्माण होणारे विनोद असायचे. पण दुर्दैवाने अलीकडच्या काळात अनेकदा विनोदाला अस्मितेशी जोडले जाते. त्यामुळे विनोदातील मर्मच निघून जाते. कारण आपल्या बोलण्यातून कोणता अर्थ निघेल व त्यातून माध्यमांमध्ये काय चालेल या भीतीने नेतेमंडळी सध्या घाबरत-घाबरत विनोद करतात अशी कोपरखळी फडणवीस यांनी मारली.