‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. भाजपकडून ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ हा कार्यक्रम गल्लीबोळात घेण्यात येत आहे. हिंगोलीतही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भाजपचेच आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यक्रमासाठी येणार्या लाडक्या बहिणींची वाट अडवली. त्यामुळे देवाभाऊंच्या रक्षाबंधन कार्यक्रमाचा बोर्या वाजला!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ हा कार्यक्रम राज्यभर घेण्याचे फर्मान सोडले आहे. त्यानुसार हिंगोलीतही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनची जबाबदारी आमदार तान्हाजी मुटकुळे, उज्ज्वला तांबाळे आणि जिजा जाधव यांच्यावर सोपवण्यात आली होती. कार्यक्रमाला येणार्या महिलांसमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार होते. पाच हजार महिला उपस्थित राहतील या अंदाजाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात बोटावर मोजण्या एवढ्याच महिला उपस्थित राहिल्या. त्यामुळे जिल्हाभरात भाजपची नाचक्की झाली.
एक दिवस अगोदरच साड्या वाटल्या
भाजपच्या अधिकृत रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाअगोदरच आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी नरसी नामदेव येथे महिलांसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर महिलांना आणण्यात आले होते. साडी मिळेल या आशेने आलेल्या महिलांची प्रचंड गैरसोय झाली. त्यामुळे महिलांनी राग राग केला. लगेच दुसर्या दिवशी पक्षाचा अधिकृत कार्यक्रम होता. परंतु प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करून आमदार मुटकुळे यांनी कार्यक्रमातून पळ काढला. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे कार्यकर्तेही निघून गेले. त्यामुळे पक्षाचा कार्यक्रम उघडा पडला.
प्रकृती बरी नसलेले आमदार कावड यात्रेत नाचले!
पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमातून प्रकृती बरी नसल्याचे सांगून काढता पाय घेणारे आमदार तान्हाजी मुटकुळे खंडाळा ते औंढा नागनाथ या कावड यात्रेत नाचताना दिसले! आमदार मुटकुळे यांचे नाचतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. ‘चहापेक्षा किटली गरम’ अशी प्रतिक्रिया त्यावर अनेक भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.