धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करीत काळे झेंडे दाखवून भंडारा उधळण्यात आला. विमानतळ मार्गावर हे आंदोलन धनगर समाज संघटनेकडून करण्यात आले. यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान, उद्या (दि. 8) होम मैदानावर ‘लाडकी बहीण योजने’च्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार सभा घेणार आहेत. मात्र, या सभेला धनगर समाज संघटना व अन्य काही संघटनांनी विरोध केला असून, सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बंदोबस्ताच्या नावाखाली सभेच्या स्थळापासून एक किलोमीटरपर्यंत रस्ते बंद ठेवले आहेत. त्यामुळे सभेपेक्षा बंदोबस्ताची चर्चा होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱयावर आले असता, विमानतळाजवळील मनरेवाडीजवळ धनगर समाज संघटनेचे कार्यकर्ते शेखर बंगाळे व त्यांच्या सहकाऱयांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत रस्त्यावर भंडारा उधळून ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.