श्री क्षेत्र देवगड दिंडीचे शनिवारी श्री क्षेत्र नेवासा येथे आगमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नेवासा

ग्यानबा तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीने व तोफांच्या सलामीने, हलक्या पावसाच्या सरीने, श्री क्षेत्र देवगड दिंडीचे शनिवारी दुपारी श्री क्षेत्र नेवासा येथे स्वागत करण्यात आले.यावेळी राज्यातील पहिला रिंगण सोहळा नेवासा बस स्थानक प्रांगणात पार पडला.

दिंडीचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली देवगडहुन शुक्रवारी निघालेल्या या दिंडीचा रात्री खडका गावात मुक्कामास होती आज शनीवारी सकाळी व्यापारी नळकांडे यांच्या मळ्यात आगमन झाले. दिंडीला भोजन देण्यात आले.

नेवासा येथे एस.टी. स्टँड प्रांगणात दिंडीचे आगमन झाल्यानंतर एस.टी. आगार व्यवस्थापक प्रियंका उन्हवणे, बसस्थानक प्रमुख रमेश सोनवणे, वासुदेव आव्हाड यांच्यासह एस.टीच्या चालक वाहक यांत्रिक कामगारांनी दिंडीचे तोफांची सलामी देत दिंडीचे स्वागत केले. उपस्थित एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा केली.

यावेळी रिंगण सोहळयास “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात सुरुवात झाली. सर्वप्रथम वारकऱ्यांचे रिंगण सादर करण्यात आले. त्यानंतर झेंडेकरी पथकाचे रिंगण व घोड्यांचे अश्व रिंगण झाले. सदरच्या झालेल्या रिंगणाने उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी बदामबाई विद्यालयातील विद्यार्थिनींनी माऊली माऊली या गीतावर नृत्य सादर केले. आगाराच्या वतीने गुरुवर्य बाबांचे संतपूजन करण्यात आले.

प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार उमेश पाटील, आमदार बालासाहेब मुरकुटे पंचायत समितीच्या सभापती सौ.सुनिताताई गडाख,गटविकास अधिकारी सुधाकरराव मुंढे, नायब तहसीलदार नारायण कोरडे, पंचायत माजी आगार व्यवस्थापक सुरेश देवकर, नेवासा नगर पंचायत अध्यक्ष दत्तात्रय बर्डे, नगरसेवक सुनील वाघ, राजेंद्र मापारी आदींनी बाबांचे हार घालून स्वागत केले.

यावेळी बोलतांना गुरुवर्य भास्करगिरी बाबा म्हणाले की, भरपूर पाऊस पडू वृक्षवल्ली फुलू दे, नद्या ओढे नाले खळखळून वाहू दे, बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी विठुरायाच्या चरणी केली.

शेतकऱ्यांना बळी राजा म्हटले जाते पण त्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. कर्जमाफी नको मात्र त्यांना वीज आणि फुकट द्या, असे त्यांनी आपली भावना बोलून दाखविली.

दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये मुक्कामास गेली असता येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज यांनी संस्थानच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे संतपूजन केले.यावेळी महाआरती झाली.