देवगड जामसंडे शहरामध्ये सध्या कचाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नगरपंचायत परिसरात डम्पिंग केलेला कचरा भिजून गेल्याने व त्या ठिकाणी गुरांचा वावर वाढल्याने दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
देवगड जामसंडे शहरात कचऱ्याचा तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र हे प्रश्न मागिल सत्ताधारी सोडवू शकले नाहीत. तसेच विद्यमान सत्ताधाऱ्यांना सुद्धा हे प्रश्न अद्यापतरी सोडवता आलेले नाहीत. कचरा डंपीग करण्यासाठी कायमस्वरुपी जागा नसल्यामुळे पवनचक्की येथील खडकात, पाणी साठवण टाकीखाली, खाजगी मालकीच्या जागेत हा कचरा मागील सत्ताधाऱ्यांच्या मार्फत टाकला जात होता. त्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा कायमस्वरुपी जागा मिळाली नाही. दोभोळे या ठिकाणी जागा मिळाली होती मात्र ग्रामस्थांच्या विरोधामुळे न.पं. परिसरातच हा कचरा डंपीग करण्यात आला. मात्र या ठिकाणी डंपीग करण्यात आलेल्या कचऱ्यावरुन कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरू झाला असून कचऱ्याच्या ठिकाणी दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरपंचायत प्रशासनामार्फत कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतू कचरा कुजल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्मान होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.