
दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या टी-20 लीग SA20 ची धूम सुरू आहे. 26 डिसेंबर पासून ही लीग सुरू झाली असून एकाहून एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रिटोरिया कॅपिटल्स आणि एमआय केपटाऊन संघात झालेल्या लढतीत चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. या लढतीत डेवाल्ड ब्रेव्हिस आणि शेरफेन रुदरफोर्ड यांनी सलग सहा चेंडू सहा षटकार ठोकण्याचा कारनामा केला.
SA20 च्या आठवी लढत न्यूलँडस मैदानात रंगली. या लढतीत प्रिटोरिया कॅपिटल्स संघाच्या फलंदाजांनी कहर बॅटिंग केली. अखेरच्या षटकांमध्ये डेवाल्ड ब्रेव्हिस आणि शेरफेन रुदरफोर्ड एमआय केपटाऊनच्या गोलंदाजांवर तुटून पडले. डेथ ओव्हर्समध्ये दोघांनी मिळून सलग सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. दोघांनी 28 चेंडू खेळले आणि यापैकी 11 चेंडू सीमापार टोलवले. विशेष म्हणजे यातील 10 षटकार होते.
Shower of Sixes from Dewald Brevis and Shurfane Rutherford 🥶🔥🔥
— The Brevis (@Ben10Brevis) December 31, 2025
सलग 6 चेंडूत 6 षटकार
एमआय केपटाऊनकडून अठरावे षटक कॉर्बिन बॉश हा टाकत होता. त्याच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर डेवाल्ड ब्रेव्हिस याने दोन खणखणीत षटकार ओढले. त्यानंतर एकोणीसाव्या षटकात रुदरफोर्ड याने मोर्चा सांभाळला आणि त्याने पहिल्या चार चेंडूवर चार षटकार ठोकले. यामुळे एमआय केपटाऊनचे गोलंदाज सैरभैर झाले.
तुफानी खेळी
डेवाल्ड ब्रेव्हिस याने अवघ्या 13 चेंडूत 4 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 36 धावा ठोकल्या. तर रुदरफोर्ड याने त्याच्याहून अधिक वेगाने धावा काढल्या. त्याने 15 चेंडूत 47 धावांची खेळी केली. यात त्याने 6 षटकार ठोकले. दोन्ही फलंदाजांनी मिळून 28 चेंडूत 83 धावांची लयलूट केली.
एमआय केपटाऊनचा पराभव
ब्रेव्हिस आणि रुदरफोर्ड यांच्या तुफानी खेळीच्या बळावर प्रिटोरिया कॅपिटल्सने 20 षटका 5 विकेट्सच्या मोबदल्यात 220 धावांचा डोंगर रचला. याचा पाठलाग करताना एमआय केपटाऊनची टीम 14.2 षटकांमध्ये 135 धावांमध्येच गारद झाली. प्रिटोरिया कॅपिटल्सने हा सामना 85 धावांनी जिंकला.
























































