‘संस्कृत असेल तरच संस्कृती टिकेल, सुसंस्कृत माणूस निर्माण होईल!’ धनश्री दीदींचे प्रतिपादन, संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्काराचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Sanskrit is the Foundation of Culture_ Dhanashree Didi at Nashik Event (7)

‘संस्कृत ही आपली भाषा आहे हा परिचय गेला तर संस्कृती टिकणार नाही. संस्कृत असेल तरच संस्कृती टिकेल आणि संस्कृती असेल तरच सुसंस्कृत माणूस निर्माण होईल’, अशा शब्दांत स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख डॉ. धनश्री (दीदी) तळवलकर यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व प्रतिपादन केले.

नाशिकच्या प. सा. नाट्यगृह येथे मंगळवारी (दि.३) ‘संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यावतीने डॉ. वि. म. गोगटे स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संस्कृत भाषा संवर्धन कार्य पुरस्कार २०२६ संस्कृत भाषा प्रसारिणी सभा ठाणे यांना देण्यात आला. यावेळी या संस्थेला मानपत्र, २१ हजार रुपये, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनवीस व संस्थेच्या कार्यवाह ऋजुता वेलणकर उपस्थित होत्या. तसेच यावेळी व्यासपीठावर संस्कृत भाषा सभेचे अध्यक्ष रमेश देशमुख, उपाध्यक्ष श्रद्धा शहा, सहकार्यदर्शिनी तेजश्री वेदविख्यात, संस्कृत भाषा सभेचे सल्लागार डॉ. विकास गोगटे व विवेग गोगटे, स्वाध्याय परिवाराचे राजीव पटेल, सावानाचे अध्यक्ष दिलीप फडके, संजय करंजकर, जयप्रकाश जातेगांवकर, सोमनाथ मुठाळ, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळ्यासाठी सावानाचे पदाधिकारी, स्वाध्याय परिवाराचे प्रतिनिधी स्वरुपात आलेले सदस्य आणि नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. प. सा. नाट्यगृहाच्या बाजूला असलेला वाचनालयाचा हॉल, बाहेरील खुल्या जागेत स्क्रीनचे आयोजन करण्यात आले होते. नाट्यगृह खचाखच भरले होते. तसेच स्वाध्यायींच्या शिस्तबद्ध पद्धतीने स्क्रीनवरही या सोहळ्याचे प्रक्षेपण पाहता आले.

यावेळी बोलताना डॉ. धनश्री दीदी यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व, त्याची आवश्यकता आजच्या काळात संस्कृत भाषेचे स्थान अत्यंत मार्मिक शब्दात मांडले.

मला सगळ्याच भाषा आवडतात!

Sanskrit is the Foundation of Culture_ Dhanashree Didi at Nashik Event (6)

दीदी म्हणाल्या की, ‘मला सगळ्याच भाषा आवडतात. इंग्रजी असो की हिंदी असो कुठलीही भाषा असो. मी मुख्यत: भाषेची व्यक्ती आहे, त्यामुळे मला सर्व भाषा आवडतात. कुठलीही भाषा उत्तमच असते ज्याने संवाद साधता येतो’.

संस्कृत ही शिस्तीची भाषा…

‘संस्कृत भाषेला एक शिस्त आहे. एकदा तुम्ही शिस्त शिकलात की म्हातारे होईपर्यंत सगळं तसंच. त्याच्यात काही फरक नाही, रोजच्या रोज बघायला नको की सरकारने शेवटला शब्द ई दीर्घ ठेवला की ऱ्हस्व. म्हणजे आता बरोबर राहणार की चूक राहणार हे बघायची जरूर नाही. संस्कृत मध्ये गति: शब्दाचा ‘ति’ र्‍हस्व म्हणजे तो मरेपर्यंत र्‍हस्व. त्यात फरक नाही. एकदा शिस्त दिली म्हणजे दिली. त्याच्या बाहेर जाणार नाही. पर्याय म्हणून कधी बदल केला जात नाही. म्हणजेच आपल्या मर्जीप्रमाणे वागता येत नाही आणि मर्जीप्रमाणे वागता येत नाही म्हणून आम्ही संस्कृतला मृत भाषा समजतो’, असं दीदी म्हणाल्या.

संस्कृत भाषा मृत ठरवल्याने अन्य भाषाही संपत आल्या…

संस्कृत भाषा शिकण्याचा आग्रह न ठेवल्याने आपले काय नुकसान झाले आहे याचा आरसा त्यांनी समाजासमोर ठेवला. ‘संस्कृत देववाणी असली तरी कुणीतरी त्यांच्या दृष्टीने मृतभाषा ठरवली. त्यामुळे प्रत्येक शाळेत संस्कृत शिकवले गेले पाहिजे असा जो आग्रह होता तो सर्वानुमते काढून टाकण्यात आला. आता कुणीही आला आणि काढून टाकला आणि आपण तो मागे ठेवला की, संस्कृत नाही शिकायचं. पण संस्कृत नाही शिकायचं तर संस्कृत मधून जन्माला आलेल्या भाषा देखील सगळ्या गेल्या. म्हणजे एकच भाषा राहिली ती म्हणजे परदेशी इंग्रजी भाषा.

संस्कृतची ताकद

यावेळी बोलताना दीदींनी संस्कृतची ताकद काय आहे हे आपल्या वक्तव्यातून मांडले. ‘संस्कृतची ताकदच ही आहे की त्यातून अनेक भाषा जन्माला आल्या. दुसरं म्हणजे संस्कृत भाषेला शिस्त आहे आणि भाषेच्या शिस्तीतून ती भाषा बोलणाऱ्याच्या जीवनाला देखील शिस्त लागते’, असं त्या म्हणाल्या.

‘तसेच संस्कृत अशी भाषा आहे की या भाषेत कुठल्याही शब्दांमध्ये रुसवा फुगवा नाही, कुणाला कमी जास्त वाटत नाही. मला कुठेही ठेवा पहिला ठेवा, मध्ये ठेवा, मागे ठेवा. ‘अहं ग्रामं गच्छामि, ग्रामं अहं गच्छामि, गच्छामि अहं ग्रामं’ सगळं बरोबरच आहे. संस्कृत भाषा सूर्यासारखी आहे. त्याच्यानंतरच्या भाषा आल्या त्यात सगळे कायदे कानून आले की नामाच्या बरोबर त्याचं विशेषण पाहिजे, क्रियेच्या बरोबर असेल तरच त्याला क्रिया विशेषण म्हणू वैगरे’, असं दीदींनी सांगितलं.

व्याकरण हा संस्कृत भाषेचा गाभा!

‘व्याकरण हा संस्कृत भाषेचा गाभा आहे. तुम्हाला व्याकरण आलं की सगळं येणार. पण आता तुम्हाला संस्कृत कशाला बरं वाटतं की काहीतरी आम्ही वेगळं करतो म्हणून ती शिकतो.

कुणीही कितीही प्रयत्न केले तरी संस्कृत ही रोजची बोलीभाषा होऊ शकत नाही. हिंदुस्थानची लोकसंख्या, इथले लोक, त्यांचा इतिहास, त्यांच शिक्षण, त्यांची पार्श्वभूमी हे सगळं पाहाता संस्कृतही बोलीभाषा होईल असं स्वप्न ठेवणं हे योग्य ठरणार नाही, , असं आपलं मत असल्याचं दीदी यावेळी म्हणाल्या. संस्कृत ही शुद्ध भाषा आहे आणि ती शुद्ध भाषा ठेवायची असल्यास तिला रोजची बोलीभाषा करू नका, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. पण संस्कृत ही आपली भाषा आहे, मातृभाषा आहे हा परिचय गेला तर आपल्या मध्ये संस्कृत नाही, संस्कृती नाही काहीच नाही. संस्कृतच्या सोबत जे येतं ते काहीच येणार नाही. संस्कृत असलं तरच संस्कृती येते, संस्कृती असेल तरच सुसंस्कृत माणूस येईल. नाहीतर सगळंच जाईल’, असं दीदी म्हणाल्या.

संस्कृत भाषा मला शिकावसं वाटतं कारण…

संस्कृत भाषा का शिकणे आवश्यक आहे याचं महत्त्व विषद करताना दीदी म्हणाल्या की, संस्कृत भाषा आहे म्हणून वेद आहेत, उपनिषद, आरण्यक, श्रुति, स्मृती, पुराण आहेत, ती भाषा आहे म्हणून माझी गीता आहेत. कारण संस्कृत नाहीतर यातलं काहीच नाही. त्यामुळे यातले काहीही समजून घ्यायचं असेल तर मला बेसिक संस्कृत शिकायला पाहिजे, असं दीदी म्हणाल्या.

भाषेचा गाभा समजून घेतला पाहिजे…

Sanskrit is the Foundation of Culture_ Dhanashree Didi at Nashik Event (6)

भाषा म्हणजे केवळ शब्द नाही, तर भाषेचा गाभा समजून घेतला पाहिजे. भाषेचा गाभा म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे ते, तुमचे मुद्दे, तुमचं तत्त्वज्ञान हा भाषेचा गाभा आहे. बाकी सगळे फक्त शब्द आहे. ते आवश्यक आहेच पण भाषेचा गाभा आहे ते विचार, भाषेचा गाभा आहे ते तत्त्वज्ञान. तेव्हा ते तत्त्वज्ञान समजण्यासाठी मला संस्कृत शिकलं पाहिजे. कारण ते दुसरीकडे कुठेही नाही.

संस्कृत भाषेतील ग्रंथांचे भाषांतरे उपलब्ध आहेत. तरी देखील ही भाषा शिकणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करताना दीदी म्हणाल्या की, ते जे भाषांतर असतं ते लिहिणाऱ्यांना जो अर्थ लागला ते सांगतात. त्यांनी जो अर्थ काढला तो ते लिहितात. तो अर्थ योग्यच आहे असं म्हणण्याचे कारण नाही. वेदांतील एका ऋचेचा अर्थ लावण्यासाठी पाचजण बसले तर पाच अर्थ लावतील. मग योग्य अर्थ कोणता हे कसं समजणार? त्यापेक्षा तुम्ही संस्कृत शिकलात तर तुम्ही त्यातून तुमचा अर्थ काढा, असं त्या म्हणाल्या. यावर पुढे बोलताना त्यांनी अगदी गमतीशीरपणे मुद्दा मांडला की, मला जर चुकीच्याच रस्त्याने जायचे असेल तर मीच चुकीचा रस्त्या शोधेन दुसऱ्याच्या चुकीच्या रस्त्याने का चालू, असे गमतीशीर विधान करत त्यांनी संस्कृत भाषा स्वत: शिकण्याचे महत्त्व ठळक केले.

आज समाज खूप सुविद्य झाला, चांगला झाला असं मी म्हणणार नाही पण चक्र फिरतंय. त्यामुळे बोलीभाषेत संस्कृत येईल असं वाटत नाही. पण नाशिकमधलं जूनं असं कुठलं घर आहे का की ज्या घरात ‘शुभं करोति’ म्हणत नाहीत? मग श्लोक संस्कृतच आहे ना. पूर्वी सगळ्या घरात ‘शुभं करोति’, पर्वचा म्हटलंच जायचं. आता म्हणतात ‘Did you light the fire’ असं विचारणारा समाज झाला असं म्हणत त्यांनी समाजाच्या सध्याच्या वाटचालीचे दर्शन घडवले. आता अशी परिस्थिती NRI समाजाची आहे. मग अशा वेळी त्यांना संस्काराची गरज वाटते आणि त्यातून ते सांगतात की आमच्या मुलांना शिकवा. पण अशा लोकांना मग तुम्ही शिकवता. हे सगळं सांगून मी तुमचे मनोबल घटवत नाही तर मला हे सांगायचं आहे की हे सगळं करून सुद्धा तिथल्या अन्य गोष्टी बदलत नाहीत तोपर्यंत याला काही अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच त्यांनी स्वाध्याय परिवारही NRI मध्ये काम करतो पण त्याची पद्धत काय आहे आणि परिणाम कसा दिसतो हे सांगताना त्या म्हणाल्या, मी तिथे दादांच्या सोबत जाऊन गेली ३० वर्षं काम करते आहे. फरक पडतोय. पण ३० वर्षं सतत तिथे जातोय, बसतोय आणि दरआठवड्याला तिथे स्वाध्याय केंद्र चालतंय म्हणून फरक आहे. तिथे आपले परिवारातील मराठी, गुजराती, तेलगु, तमिळ आहे त्यांची मुलं दर आठवड्याला बालसंस्कार केंद्रात बसतात त्यांना गोष्टी, श्लोक शिकवली जात आहेत. आज ते त्यांच्या इथल्या नातेवाईकांना सांगतात की जेवणाआधी ‘ॐ सह नाववतु… ‘ बोला! हा परिणाम आहे’, असं त्यांनी सांगितलं.

आई – वडिलांची दक्षता, समर्पण पाहिजे

समाजात फरक होतो आहे, पण त्यासाठी आई-वडिलांचेही संपूर्ण समर्पण पाहिजे, मुलांवर नियंत्रण पाहिजे आपण जसे काम करतो, तशी सगळ्या संस्थांनी मिळून त्यांच्याशी जोडून कामं करायला पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सीडी देशमुख यांची आठवण जागवली

दीदी म्हणाल्या मी संस्कृत शिकले. मी विद्यापीठात खासगी शाळेत शिकत होते तेव्हा आम्हाला संस्कृत होते. पाचवी सहावीत असताना एकदा विद्यापीठात तेव्हाचे अर्थमंत्री असलेले सीडी देशमुख आले होते. सीडी देशमुख हे आमच्या रोहा गावचे. सीडी देशमुख तेव्हा म्हणाले की, शास्त्रीजी इतक्या साऱ्या लोकांमध्ये कुणी संस्कृतमध्ये स्वागत नाही का करणार? तेव्हा शाळेत संस्कृत शिकत असल्याने मी तीन ते चार मिनिटे संस्कृत मध्ये सादर केले होते.

श्रीविष्णुसहस्त्रनाम पुस्तकाचे प्रकाशन

संस्कृत भाषा सभा, नाशिकच्या कार्यदर्शिनी सरिता देशमुख कोषाध्यक्षा शोभा सोनवणे लिखित श्रीविष्णुसहस्त्रनाम पुस्तकाचे प्रकाशन डॉ. धनश्री (दीदी) तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आले.’

Sanskrit is the Foundation of Culture: Dhanashree Didi at Nashik Event

Dr. Dhanashree (Didi) Talwalkar emphasized the importance of Sanskrit language in building a cultured society during an award ceremony in Nashik. Read her insights.