
सामना प्रतिनिधी । तुळजापूर
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी तुळजापूर ते चौंडी ’भाजप सरकार चले जाव’ पदयात्रेला सुरुवात झाली आहे. धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरक्षण देण्यात यावे, धनगर समाजाला न्याय न दिल्यास समाजाचा उद्रेक होईल असा इशारा जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे भूम तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांनी तुळजापुर येथे दिला आहे. यावेळी तुळजापुर तहसिलदारांना आपण्या मागण्यांचे निवेदन देण्यांत आले.
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने १६ ते २८ ऑगस्ट या दरम्यान हे आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी सुरेश कांबळे, आ. रामहारी वडकुते, आ. नारायण पाटील, आ. प्रकाश शेंडगे उपस्थित होते. या आंदोलनात धनगर बांधव मोठ्या संखेने आपल्या शेळ्या – मेंढ्या, गाईसह – म्हशीसह सहभागी झाले होते. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती रथामध्ये ठेवून या पदयात्रेला सुरुवात झाली.
दरम्यान, ही पदयात्रा तुळजापूर येथून गौडगांव, बार्शी, कुर्डूवाडी, करमाळा, जातेगांव मार्गे २८ ऑगस्ट रोजी चोंडी येथे पोहोंचणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गाव अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे.































































