
>> धीरज कुलकर्णी
शब्द हे ताकदीचे माध्यम ज्याला गवसले आहे, अशा लेखकावर ही मोठीच जबाबदारी असते की, बोलू न शकणाऱ्या वर्गाचा त्याने आवाज व्हावे. समाजातील सर्व घटकांच्या समस्या या लेखनाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येतात. 2025 चे बुकर पारितोषिक मिळवणाऱया ज्येष्ठ कन्नड लेखिका बानू मुश्ताक हा असाच एक बंडखोर आवाज, ज्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या कथासंग्रहाच्या अनुवादास 2025 चे बुकर पारितोषिक मिळाले आहे.
लेखक हा शब्दसृष्टीच्या माध्यमातून एक आगळे विश्व निर्माण करतो. वास्तवापासून हे विश्व निराळे असले तरी लेखक संपूर्णपणे वास्तवापासून फारकत घेऊ शकत नाही. शब्द हे ताकदीचे माध्यम ज्याला गवसले आहे, अशा लेखकावर ही मोठीच जबाबदारी असते की बोलू न शकणाऱया वर्गाचा त्याने आवाज व्हावे.
2025 चे बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या ज्येष्ठ कन्नड लेखिका बानू मुश्ताक हा एक बंडखोर आवाज आहे. 1948 ला जन्मलेल्या बानू मुश्ताक यांनी लघुकथा हा साहित्यप्रकार मुख्यत्वेकरून हाताळला. त्यांचे काही कथासंग्रह कन्नड भाषेतून प्रकाशित झाले आहेत. आणि कथांचे अनुवाद अनेक भाषांमधून प्रकाशित आहेत.
आठ वर्षांची असताना लहानग्या बानूला एका अटीवर शाळेत प्रवेश मिळाला, ती म्हणजे तिने सहा महिन्यांत कन्नड भाषा शिकावी. मात्र, बानू यांनी काही दिवसातच कन्नड भाषेत प्राविण्य मिळवले. ‘लंकेश पत्रिके’मध्ये पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांचा सामाजिक चळवळींशी जवळचा संबंध आला. यातूनच मूलतत्त्ववाद व सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला.
मुस्लिम स्त्रियांना मशिदीत प्रवेश मिळावा यासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या कुटुंबावर काही काळ बंदी घालण्यात आली होती व त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला. विशेषत स्त्रियांचे हक्क व शिक्षण याबाबतीत त्यांनी जोरदार लेखन केले. पहिल्या प्रसूतीनंतर त्या नैराश्याच्या विकाराने काही काळ ग्रासलेल्या होत्या. त्यातूनच कथालेखनाच्या माध्यमाने त्यांना बाहेर काढले. कन्नड, हिंदी, दखनी उर्दू व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असणाऱया बानू लेखन मुख्यत कन्नड भाषेतूनच करतात.
‘हार्ट लॅम्प’ या त्यांच्या कथासंग्रहाच्या अनुवादास 2025 चे बुकर पारितोषिक मिळाले. बानू मुश्ताक यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित झालेल्या काही कथा यात समाविष्ट आहेत. कथासंग्रह साहित्यप्रकारास बुकर पारितोषिक मिळण्याची ही पहिलीच घटना होय. सन 70 ते 80 च्या दशकात कन्नड साहित्यामध्ये बंडाया साहित्य चळवळीने जोम धरला. आपल्याकडे मराठी साहित्यात ज्याप्रमाणे साठोत्तरी काळ आला, दलित आत्मकथने आली, लिटल मॅगझीनची चळवळ आली, त्याच धर्तीवर प्रस्थापित रुढींविरोधात बंड करू पाहणारी ही चळवळ. यातूनच बानू मुश्ताक यांचा उदय झाला.
असे असले तरी त्यांची शैली ही इतरांपेक्षा भिन्न व स्वतंत्र, स्वयंभू आहे. आपली मराठी भाषा जशी बारा कोसांवर रूप बदलते, तसेच काहीसे कन्नड भाषेचंही आहे. उत्तर कर्नाटक व दक्षिण कर्नाटक इथल्या कन्नडमध्ये बराच फरक असतो. बानू यांच्या लेखनात या दोहोंचा संगम आढळतो. सामाजिक असमानता, अन्याय, स्त्रियांचे प्रश्न हे गंभीर विषय आहेत. पण बानू हे विषय हाताळताना त्याला एक नर्मविनोदाची झालर देतात, जेणेकरून वाचकांसाठी ते थोडे सुसह्य व्हावे आणि विषयाचे गांभीर्यही नष्ट होऊ नये.
बानू मुश्ताक सांगतात, की कथांसाठी त्यांना खूप संशोधन करण्याची आवश्यकता भासत नाही. आपल्या आसपासचा समाजच लेखकाला इतका कच्चा माल पुरवतो ते पुरेसे असते. त्यांच्या पात्रांचे संघर्ष अनेकदा चालू असलेल्या लढायांच्या रूपात सादर केले जातात, जे उपेक्षित लोकांच्या वास्तविक जगातील प्रतिकाराचे प्रतिबिंब आहेत. साध्या आनंदी शेवटांना नकार देणे हे तिने उघड केलेल्या अन्यायांच्या खोलवर रुजलेल्या स्वरूपाचे अधोरेखित करते आणि सतत प्रतिकार करण्याच्या शक्यतेवर भर देते. हे कदाचित थोडे निराशाजनक वाटू शकते. पण हेही लक्षात घ्यायला हवं की, सामाजिक लढय़ाची परंपरा ही फार जुनी नाही. कथेचा आशावादी, आनंदी शेवट केल्याने वाचकाला एक तात्पुरते समाधान प्राप्त होते, पण एकंदर त्या कथेवर, एकूणच विषयावर पुन्हा अन्यायच होतो.
दुःखांत शेवट किंवा एक समाजावर ज्याचा निर्णय सोडून दिला आहे असा शेवट करताना जणू बानू मुश्ताक प्रश्न विचारतायत की अन्यायाची ही परंपरा अजून किती काळ सुरू राहणार हे आपणच ठरवायचे नाही तर आणखी कोणी?
आणि तरीही अगदी ताज्या बातमीत म्हैसूरच्या दसऱयाच्या प्रसिद्ध कार्यक्रमाचे उद्घाटन करायला कर्नाटक सरकारने बानू मुश्ताक यावर्षी विशेष पाचारण केले असताही, केवळ कट्टरतावाद्यांच्या विरोधामुळे त्यांना तिथे जाता आले नाही. ही बातमीच आपल्या समाजाचा प्रवास अधोरेखित करणारी नाही का?
[email protected]




























































