भाषा सरस्वती – अमर्याद परिघाचा आवाज

>> धीरज कुलकर्णी

दमन, अन्यायाची शिकार ठरलेल्या स्त्रीचा आवाज कथासाहित्यातून पोहोचवणाऱ्या आशापूर्णा देवी. बंगालमध्ये जन्मलेल्या आशादेवींच्या लेखनावर रवींद्रनाथांचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या लेखनातील स्त्रीदर्शन हेही बऱ्याचदा आशापूर्णा देवींच्या लेखनात आढळून येते.

भारतीय समाजाच्या रचनेत स्त्री आजही किती बंधनांमध्ये राहते हे नव्याने कुणाला सांगण्याची गरज नाही. गेल्या शतकाच्या सुरुवातीला तर समाज जुन्या विचारांचा असल्याने स्त्री बंधनांचा अतिरेक होता. अनेक सुधारकांनी प्रयत्न केल्याने थोडीफार परिस्थिती बदललीय.

अशा परिस्थितीत शिक्षण मिळालेले नसतानाही एक स्त्री लेखिका होते. इतकेच नव्हे तर दीडशे कादंबऱ्या आणि दीड हजाराहून अधिक कथा लिहिते. हे किती गौरवास्पद कार्य आहे!

आशापूर्णा देवी यांचा जन्म बंगालमध्ये 1909 साली झाला. मध्यमवर्गीय, परंतु मोठे कुटुंब. आठ भाऊ,बहिणी. त्या काळच्या प्रथेनुसार मुलींनी शाळेत जायचं नाही. घरीच काय ते शिकायचे. आईला वाचनाची आवड असल्याने ती लहान आशापूर्णालाही लागली. घरामध्येच वाचन, लेखन सुरू झाले. कथा, कादंबरी या साहित्य प्रकारात त्यांनी प्रामुख्याने लेखन केले.

रोजचा निरीक्षणाचा परीघ हा त्यांच्या शब्दानुसार अगदी एका ‘खिडकीतून’ असला तरी त्यांना त्यातून दिसलेले जग विशाल होते. सोबतीला केलेले अफाट वाचन होतेच. त्यामुळे कथालेखनाला सुरुवात करताना आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्यातील माणसे, हेच त्यांच्या कथांचे केंद्रबिंदू झाले. काही काळानंतर घराबाहेर पडू लागल्यावर कथांचा विस्तार अजून वाढला. कथा प्रसिद्ध तर होत होत्या, पण आशापूर्णा देवी कोण हेच अनेक लेखकांना व वाचकांना ठाऊक नव्हते. अनेक लेखक तर म्हणत, कुणी पुरुषच हे टोपणनाव घेऊन लिहीत आहे.

रोजच आसपास घडणाऱ्या घटना या आशापूर्णा देवींच्या कथा होतात. साधीच माणसे त्यातील पात्रे, पण लेखिकेचा तिथे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याबद्दल त्यांनी गंभीरपणे सखोल विचार केला आहे आणि तोच विचार कोणताही अभिनिवेश न धरता वाचकांपर्यंत पोचवणे हे कथेचे कार्य. कुठलाही धक्का न बसता वाचक विचारप्रवृत्त होणे हे कथेचे यश.

स्त्रीवरील बंधने आशापूर्णा देवींनी स्वत अनुभवली असली तरी त्यांचा सूर कुठेही निराशावादी नाही. रूढार्थाने स्त्रीवादी लेखन त्यांनी केलेले नाही. दमन, अन्याय हा समाजात अनेक घटकांवर सतत होत आला आहे. स्त्री त्यातील एक भाग. त्यामुळे त्यांच्या कथांमध्ये या दमनाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आहे. अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, जातीधर्मवाद ही या देशातील दुःखाची, सामाजिक अनारोग्याची खरी कारणे होत. त्यामुळे स्त्रीवाद हा इथे अनेक अंगांनी तपासावा लागतो. हे आशापूर्णा देवींनी त्या काळीच ओळखून कथांची रचना केली. स्वत आशापूर्णा देवी जरी म्हणतात की, साहित्य हे कालसापेक्ष आहे आणि काळानुसार ते बदलत जाईल तरी आजही त्यांच्या कथा वाचताना त्या कितीतरी कालसुसंगत असल्याचे जाणवते. त्याचे कारण म्हणजे काळापुढे जाऊन त्यांनी केलेला विचार.

बंगालमध्ये जन्म झालेला असल्याने रवींद्रनाथांचा प्रभाव हा त्यांच्यावर असणारच. रवींद्रनाथांची अनेक वाक्ये त्या उद्धृत करतात. त्यांच्या लेखनातील स्त्री दर्शन हेही बऱ्याचदा आशापूर्णा देवींच्या लेखनात आढळून येते. केवळ सामाजिक जाणीव हीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा नाही. साहित्याची रचना करताना साहित्यिकाला अनेक इतर बाबींचेही भान ठेवावे लागते. आशापूर्णा देवींच्या साहित्यात बंगालमधील नद्या, ऋतू, निसर्ग हेही येतात. त्यांच्या कथांमधील पात्रांची सूक्ष्म मनोआंदोलने त्या विस्तारपूर्वक लिहितात, जेणेकरून वाचक कथेशी अधिक समरस होईल. घटनांमधील वैविध्य तर इतके की, लेखिकेला चार भिंतींबाहेरचे हे जग केव्हा दिसले असा अचंबा वाचकाला व्हावा.

प्रदीर्घ अशा लेखन कारकीर्दीत आशापूर्णा देवींनी माणसांच्या व्यक्तिगत समस्यांची उत्तरे सामाजिक रचनादोषात शोधली. त्यांच्या मते, माणूस हा अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित होत चालला आहे. समाजापासून तो निरनिराळ्या प्रकारे अलग होतो आहे. समाज म्हणून एकसंधतेचा विचार हा पुढे येण्यासाठी लेखकांनी, कलाकारांनी काम करणे गरजेचे आहे. त्यांच्या लेखनकार्याबद्दल त्यांना पद्मविभूषण, ज्ञानपीठ असे अनेक मोठमोठे सन्मान प्राप्त झाले तरी आशापूर्णा देवी नम्रपणे आपण सामान्य लेखिकाच असल्याचे आवर्जून सांगतात.

आशापूर्णा देवींचे साहित्य हे आजच्या काळातही तितकेच वाचले जाते. लेखनाची साधीसोपी शैली, रोजच्या जगण्यात घडणारे उठावदार प्रसंग यामुळे त्यांच्या कथा वेगळ्या दिसतात. पात्रांच्या संवादातून जणू आपल्या जवळची व्यक्ती बोलत आहे असे वाचकाला वाटते.

आशापूर्णा देवींना जरी अनेक मानसन्मान लाभले तरी देशभरातील वाचकांनी दिलेले प्रेम व प्रतिसाद हाच महत्त्वाचा खरा. मराठीत त्यांच्या अधिकाधिक कथा येवोत आणि आपल्यालाही त्यांचा लाभ होवो.

[email protected]