
>> धीरज कुलकर्णी
भाषा या विषयाबद्दल झुंपा लाहिरीचे ‘इन अदर वर्ड्स’ हे पुस्तक अनेक प्रकारे वाचकाला विचारप्रवृत्त करते. लेखिका वीस वर्षे इटालियन भाषा शिकली. त्या भाषेतून तिने पुस्तक लिहिले, याची हकीकत ती सांगते. पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर मात्र तिने केले नाही. याचीही कारणे ती सांगते… इटलीला प्रथम जाताना तिने ‘टूर गाईड’ पुस्तक घेतले नाही तर डिक्शनरी घेतली. जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती तर इंग्रजी. ती जगभरात बोलली जाते. त्या खालोखाल चिनी मंडरीन आणि हिंदीचा नंबर लागतो. तो कोणत्या निकषावर तर जास्त लोक बोलतात म्हणून. जास्त लोकसंख्या आहे, म्हणून जास्त लोक बोलतात हे सरळ सत्य आहे. मात्र या जगभर बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत का?
भाषा जागतिक होते याचा अर्थ काय, तर जगभरात सर्व लोकांना जोडणाऱ्या भाषा याच जागतिक म्हणता येतील. यात इंग्रजी आणि स्पॅनिश या दोनच भाषा सध्या तशा म्हणता येतील. खूप लोकसंख्या एखादी भाषा बोलते कारण ती त्यांची मातृभाषा आहे, म्हणून ती भाषा जागतिक होऊ शकत नाही. झुंपाने भाषेला एका खोल सरोवराची उपमा दिली आहे. या किनाऱ्याशी आपण आहोत…पलीकडचा किनारा दिसत असूनही दूर भासतो. खोल तळ्याच्या मध्यभागाचा तळ दिसत नाही. सरोवर फार मोठे नाही, पण एकटय़ाने पोहायची भीती वाटते आणि मग मनाचा हिय्या करून एकवार आत उतरले की नकळतपणे ते पारही होऊन जाते.
इटालियन भाषा शिकणे लेखिकेला अगत्याचे वाटले. ते का वाटले याची कारणे शोधायचा प्रयत्न तिने केला, पण तिला हे जाणवलं की भाषा शिकणे तिच्यासाठी गरजेचे आहे. कोणताही फायदा नसताना. या प्रयत्नात तिला ज्या अडचणी आल्या त्या लेखिका कोणताही आडपडदा न ठेवता सांगते. जरी अडचणी आल्या तरी लेखिकेने हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. ती इटालियन शिकण्यासाठी रोमला गेली. जाण्याअगोदर तिने काही पुस्तके वाचली, इटालियन भाषेतून. इंग्लिश भाषा तिने वापरातून बंद केली. छोटय़ा छोटय़ा प्रकरणांमधून लेखिका आपला प्रवास सांगते.
परकीय भाषा शिकत असताना डिक्शनरीचा वापर तिने कसा केला, शब्दांचे नेमके अर्थ लावताना कशी तारेवरची कसरत करावी लागली हे ती सांगते. हे नक्की वाचण्याजोगे आहे. नव्याने भाषा शिकणाऱ्यांसाठी हे उपयुक्त ठरेल. आज कितीही अवघड शब्द असला तरी मोबाईलच्या मदतीने क्षणार्धात त्याचा अर्थ, मागचे-पुढचे समानार्थी शब्द असे बरेच काही हाती लागते. पण अगदी पंधरा वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हतीच. काळ किती झपाटय़ाने बदलत गेला आपल्याला जाणवते.
इटालियन भाषाच का याबद्दल कोणतेही ठोस उत्तर लेखिकेकडे नाही, तरीही नेटाने तिने प्रयत्न सुरू ठेवले. भाषा शिकताना हातून झालेल्या चुकांची लेखिका मनमोकळेपणाने कबुली देते. हे फार जरुरी आहे. त्याशिवाय तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू शकत नाही. या स्थितीत असताना लेखिकेला एक कथा सुचली, ती कथाही या पुस्तकात समाविष्ट आहे.
कोणत्याही भाषेत लिहिण्याची प्रक्रिया ही जिकिरीची असतेच. लेखकाला त्यातून जावेच लागते. त्या त्या भाषेत पूर्वसुरींनी करून ठेवलेल्या डोंगराएवढ्या कार्याशी आपली तुलना करण्याचा मोह आपल्याला होतो, पण त्या कार्याचा बाऊ न करता लेखकाने लिहीत राहावं हे खरं. इटलीमध्ये राहत असताना झुंपाला दिसलेल्या प्रत्येक गोष्टीची तुलना ती भाषेशी करते. इटलीमधले रस्ते, तिथले भुयारी मार्ग, व्हेनिसमधले पूल सगळ्यात तिला भाषा शिकण्याची प्रतीके दिसतात. रुपकांचा मुक्तहस्ताने वापर तिने केला आहे.
एके ठिकाणी ती स्वतची तुलना डाफने या ग्रीक मिथकातील नायिकेशी करते, जिचे रूपांतर एका अप्सरेतून एका झाडात झाले. भाषा शिकताना असे बदल स्वतत होतात असे ती म्हणते. याच मेटामॉर्फासिस सूस्दज्प्देग्sचा लेखिका वेगळ्या अंगानेही विचार करते. मनुष्य कला का जोपासतो? चित्रपट, पुस्तक आदी का पाहतो? तर स्वतत बदल घडवण्यासाठी, स्वतला पूर्वी जे माहीत नव्हतं ते माहीत करून घ्यायला. कलेचे अशा प्रकारे प्रयोजन शोधणे लेखकाचे कामच आहे. The power of art is the power to wake us up. भाषा शिकतानाचे बारकावे लेखिकेने सोदाहरण स्पष्ट केले आहेत, त्यामुळे भाषा शिकण्याची प्रक्रिया कशी असते याचा वाचकाला अंदाज येतो. महत्प्रयासाने लेखिकेने भाषा इतकी उत्तम शिकली की त्यातून ती पुस्तक लिहू शकली. भाषांतर करणे कितीही सोपे वाटले तरी स्वतच इटालियन भाषेतून लिहिलेला लेख पुन्हा इंग्रजीत भाषांतर करताना किती अवघड गेलं याचाही खुमासदार किस्सा यात आहे. संवेदनशीलता हा लेखकाचा गुणच असतो. म्हणून मनातील आंदोलने सूक्ष्मरित्या टिपणे तिला सहज जमले आहे. नुकतीच शिकलेली इटालियन भाषा ही जणू अर्भकासारखी आहे, आणि तिचे रक्षण करणे लेखिकेला अगत्याचे वाटते.
समारोपाच्या प्रकरणात झुंपाने काही आशावाद व्यक्त केला आहे. यानंतरही इटालियन भाषेतून लिहिण्याचा तिचा मानस आहे. केवळ मोठी लेखिका म्हणून मिरवून घेण्यापेक्षा भाषेसाठी तिने घेतलेले कष्ट हे वाचकाला भावतात. वेगळी भाषा शिकून समृद्ध होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच आनंददायी ठरेल.