
>> धीरज कुलकर्णी
गेल्या शतकामध्ये भारतात जे सामाजिक बदल झाले, ते अनेक लेखकांनी आपापल्या नजरेने लिहून लोकांपुढे आणले. आत्मचरित्र, प्रवासवर्णने, कथा-कविता सर्वच वाङ्मयात अशी वर्णने आढळतात. जुना राजेशाही कालखंड संपून, लोकशाहीचा स्वीकार या देशाने करणे ही एका रात्रीत घडलेली प्रक्रिया नव्हती. गुलामी मानसिकतेचे जिणे झुगारून समतेची कास धरणारा नवा मंत्र लोकांना मिळाला तरी पदोपदी अनेक अडचणी आल्या. आजच्या शहरी भागातील जनतेला, स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी इथल्या ग्रामीण सामाजिक स्तरात कसेकसे बदल झाले, याची जाणीव होणे अशक्य आहे.
ना. व्यं. देशपांडे हे गेल्या पिढीतील कथाकार. राष्ट्र सेवादलाचे स्वयंसेवक म्हणून काम केलेले. ना. व्यं. देशपांडे यांची फारशी माहिती आजच्या पिढीला नाही. इंटरनेटवरही संदर्भ उपलब्ध नाहीत. ते मौज प्रकाशनाचे लेखक. मात्र त्यांच्या कथासंग्रहाऐवजी सध्या फक्त ‘सरकार ते सरकार’ हे त्यांचे आत्मचरित्र दुर्मिळ प्रमाणात उपलब्ध आहे. हे आत्मचरित्र मौज प्रकाशनाने 1982 साली प्रकाशित केले.
कोल्हापूर संस्थानातील एका गावात, सरंजामी संस्थानिक घरात त्यांचा जन्म झाला. घरात जुने राजेशाही वळण. भली थोरली शेतीवाडी, जमीनजुमला, घर माणसांनी भरलेले. इथपासून, ते मुंबईतील नोकरी सोडून पुन्हा गावाला शेती करण्यासाठी येण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या प्रवासातील घडलेल्या घटना म्हणजे ‘सरकार ते सरकार’ हे आत्मचरित्र.
जुन्या काळात गावकरी घरातील सर्वांना सरकार असे संबोधत. स्वातंत्र्यानंतर मात्र लोकशाही सरकार हेच खरे सरकार झाले. म्हणून हे पुस्तकाचे नाव. या संस्थानी वातावरणात रोज बिनकष्टाचे खाणे, इतरांच्या श्रमावर जगणे चूक आहे, हे गाव सोडून शहरात आल्यावर, राष्ट्र सेवादलात जाऊ लागल्यावर लेखकाला प्रकर्षाने जाणवले. आपल्या परिस्थितीत बदल घडवायचा असेल तर शिक्षण घेणे, अंगमेहनत करून कमाई करणे गरजेचे आहे हे त्यांना पटले.
थोरल्या काकांच्या निधनानंतर वारस म्हणून इस्टेट लेखकाच्या ताब्यात येणार होती. मात्र, दत्तकविधान नसल्याने त्यात अनंत अडचणी आल्या. स्वातंत्र्यानंतर आधुनिक शिक्षण घेणारी पिढी तयार झाली. बहुतेकांनी रोजगार, उद्योगासाठी गावे सोडून शहराकडे धाव घेतली. लेखकानेही वकिलीचे शिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केला. संस्थानात असलेल्या जमिनी कूळ कायद्यानुसार कुळांच्या नावे झाल्या. संस्थाने खलास झाली. यातही पुन्हा कोर्टकज्जाचे प्रकार झालेच. पण कायद्यानुसार जमिनी कुळांच्या असल्याने कोर्ट ही फक्त औपचारिकता म्हणून होती.
कूळ कायद्यात जमिनी जाऊ नयेत म्हणून त्याकाळी अनेक जमीनदारांनी कंपन्या स्थापन करून त्यांच्या नावे जमिनी केल्या. अर्थात त्यातही फसवणुकीचे अनेक प्रकार झालेच. शिल्लक राहिलेल्या थोडय़ाफार जमिनीवर तरी कष्ट करावेत म्हणून लेखकाने मुंबई सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला. शेतीत त्यांनी बरेच प्रयोग केले. काही वेळा यशस्वी झाले, काही वेळा अपयश आले. तो काळ हरितक्रांतीपूर्वीचा होता. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीला फारशी जोड मिळत नसे.
कूळ कायद्यात बरीचशी जमीन गेलेली. नंतर केलेल्या शेतीतही तोटा झाल्याने लेखकाने उरलेली जमीन विकून मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. परंतु काही केल्या मनातून शेती जाईना. अगदी ज्योतिषाचाही सल्ला घेतला. अखेरीस, निवृत्तीनंतर भाडेपट्टय़ावर जमीन घेऊन शेती कसण्याचा निर्णय घेतला. तोवर मुले मोठी होऊन स्थिरस्थावर झाली होती.
हे आत्मचरित्र लिहिण्याची भूमिका विशद करताना लेखक सांगतात, ‘त्या काळातील सामाजिक बदलांची टिपणे काढतानाच मानवी प्रवृत्तीमध्ये कसे बदल होत गेले याचेही चित्रण केले आहे. शोषण थांबल्याप्रमाणे जाणवले, तरी शोषण करणारी माणसे बदलली, प्रकार बदलले, ते अधिक सूक्ष्म झाले.’
डायरी लिहिण्याची सवय असल्याने, पुस्तकातील बरेच संदर्भ हे डायरीतील आठवणींमधून घेतलेले आहेत. त्यांचे अधिक चांगल्या प्रकारे संपादन होणे गरजेचे होते, हे वाचताना जाणवते. काही ठिकाणी विस्कळीतपणा जाणवतो, तो दोष दूर करता आला असता.
असे असले तरीही पुस्तकाचे एक काळानुसार महत्त्वाचे मूल्य आहेच. ना. व्यं. देशपांडे यांच्यासारख्या विस्मृतीत गेलेल्या जुन्या चांगल्या लेखकांचा शोध घेऊन त्यांच्या साहित्यकृती नव्याने प्रकाशात येणे आजच्या काळासाठी गरजेचे आहे.