
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या ‘धुरंधर ः द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अवघ्या चारच दिवसांत जगभरात 750 कोटी रुपयांची कमाई केली आहे. काल रविवारी वीकेंडला ‘धुरंधर’ने तब्बल 114.85 कोटी रुपये कमावले आहेत. या कमाईसोबत ‘धुरंधर’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि राजामौलीच्या ‘आरआरआर’ या बडय़ा चित्रपटांचा विक्रम मोडीत काढला आहे.
शाहरुखच्या ‘पठाण’ने पाच दिवसांत 287 कोटी रुपये कमावले होते, तर ‘आरआरआर’ चित्रपटाने 470 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘बाहुबली 2’ने 591 कोटी, ‘कल्की’ 2898, ‘एडी’ने 500 कोटी आणि ‘पुष्पा-2’ने 762 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने हिंदुस्थानसह जगभरात 1 हजार 307 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण एक हजारहून अधिक रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. ‘धुरंधर’ने अमेरिका आणि कॅनडामध्ये 193.06 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून ‘बाहुबली-2’चा विक्रमही मागे टाकला होता. ‘धुरंधर’ने अवघ्या तीन दिवसांत ‘बॉर्डर-2’च्या 470 कोटी रुपयांच्या कमाईला मागे टाकून 2026 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान पटकावला आहे. रविवारच्या जबरदस्त कलेक्शननंतर ‘धुरंधर-2’ने ‘गदर-2’च्या 691 आणि ‘सालार’च्या 690 कोटी रुपयांच्या लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्डही मोडून काढला आहे.





























































