‘दही’ आणि ‘योगर्ट’ यात नक्की काय फरक असतो? वाचा सविस्तर

दुग्धजन्य पदार्थ हा हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दूध, दही, ताक, लोणी, तूप या पाचही घटकांचा आपल्या अन्नात समावेश असतो. त्यातही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये दह्याचा क्रमांक पहिला लागतो.

याला कारणही तसंच आहे. गोडापासून तिखटापर्यंत अनेक पदार्थांमध्ये दह्याचा समावेश केला जातो. इतकंच नव्हे तर सामिष भोजनातही मॅरिनेशनसाठी दहीच वापरलं जातं. दह्यासोबत जिलेबी खाणं असो, दहीभात असो किंवा दह्यापासून बनवलेलं श्रीखंड. हिंदुस्थानी भोजन दह्याशिवाय अपूर्ण आहे.

कदाचित म्हणूनच बाहेर जाताना किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना हातावर दहीसाखर ठेवली जाते. पण, या दह्याचं एक आधुनिक रूप सध्या बाजारात पाहायला मिळतं. त्याला योगर्ट असं म्हटलं जातं. पण, अनेकांना हा प्रश्न पडतो, की दही आणि योगर्ट हा एकच पदार्थ आहे की वेगळा? या प्रश्नाचं उत्तर कोरा या संकेतस्थळावर देण्यात आलं आहे.

योगर्ट आणि दही हे अर्थात दोन वेगळे पदार्थ आहेत. योगर्ट हा मूळचा तुर्की शब्द आहे. आपल्याकडे आपण दुधाला विरजण लावतो, त्याला शास्त्रीय भाषेत किण्वन असं म्हणतात. अर्थात किण्वनाची प्रक्रिया दही आणि योगर्ट या दोघांमध्येही होते. पण, योगर्टमध्ये थोडी वेगळ्या पद्धतीने होते.

योगर्टमध्ये प्रामुख्याने गायीचे दूध वापरलं जातं. ते बनवण्यासाठी दुधात जीवाणूंच्या मदतीने यिस्ट तयार केलं जातं. या जीवाणूंना योगर्ट कल्चर असं म्हटलं जातं. तापवलेल्या आणि पाश्चराईज्ड दुधात जीवाणू सोडल्यानंतर काही काळाने दुधातील लॅक्टोज आंबायला सुरुवात होते आणि ते घट्ट होऊन लॅक्टिक अॅसिड तयार होतं. त्यामुळे दूध घट्ट होतं आणि त्यापासून योगर्ट तयार होतं.

अर्थात दोन्ही पदार्थांच्या चवी, कॅलरीज आणि पोषक तत्त्वांमध्येही फरक आहे. दही योगर्टपेक्षा जास्त आंबट असतं. त्यात कॅलरीजही कमी असतात. तसंच दही हे फक्त दुधाचं असतं. योगर्ट निरनिराळ्या फळांच्या रसाचा वापर करूनही बनवता येतं.

आपली प्रतिक्रिया द्या