भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने चेन्नईत निधन झाले. राकेश पाल यांना अस्वस्थ वाटू लागल्याने राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन अँजिओ टेस्ट करण्यास सांगितले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रुग्णालयात जाऊन राकेश पाल यांना श्रद्धांजली वाहिली. राकेश पाल यांचे पार्थिव दिल्लीत आणले जाणार आहे.
कोण होते राकेश पाल?
राकेश पाल हे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. गेल्या वर्षी त्यांची भारतीय तटरक्षक दल (ICG) चे 25 वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी होते. राकेश पाल हे जानेवारी 1989 मध्ये भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले. त्यांनी द्रोणाचार्य, इंडियन नेव्हल स्कूल, कोची आणि यूकेमधील इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन कोर्समधून तोफखाना आणि शस्त्रास्त्र प्रणालींमध्ये व्यावसायिक कौशल्य प्राप्त केले होते.
राकेश पाल यांना 34 वर्षांचा अनुभव होता. याशिवाय त्यांनी कोस्ट गार्ड मुख्यालय, ICGS विजित, ICGS सुशेथा कृपलानी, ICGS अकालीबाई आणि ICGS-03 येथे संचालक (पायाभूत सुविधा आणि कार्य) आणि प्रधान संचालक (प्रशासन) पदांची जबाबदारी सांभाळली आहे.