तू दहावीला आहेस, अभ्यास कर… सतत मोबाईलमध्ये डोकावून नकोस, असे आई-बाबा ओरडतात म्हणून तिने टोकाचे पाऊल उचलले. सकाळी कोणाला काही न सांगताच ती घराबाहेर पडली आणि तिने दादर गाठले. पुढे करायचे काय, जायचे कुठे अशा संभ्रमावस्थेत असताना भोईवाडा पोलिसांची तिच्यावर नजर पडली. त्यामुळे तिची सुखरूप घरवापसी झाली.
ठाण्यात ती विद्यार्थिनी आईवडिलांसोबत राहते. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ती दादर पूर्वेकडील कैलास लस्सीजवळ कावऱ्याबावऱ्या अवस्थेत उभी होती. करायचे काय, जायचे कुठे तिला काहीच कळत नव्हते. तेवढय़ात तेथे बंदोबस्तावर असलेल्या मंजुषा वानखेडे यांची नजर त्या मुलीवर पडली. त्यांना काहीतरी गडबड वाटल्याने वानखेडे यांनी त्या मुलीला आपल्याजवळ बोलावले. तिला विश्वासात घेत आपुलकीने तिची विचारपूस केली. तिला धीर दिल्यावर मुलगी बोलू लागली. दहावीत शिकत असून आई-बाबा ओरडतात, मोबाईल हाताळू नको असे बोलतात म्हणून घर सोडून येथे आल्याचे तिने सांगितले. मग सहाय्यक फौजदार कांबळे, अंमलदार वानखेडे, कराळे यांनी मुलीला पोलीस ठाण्यात नेले. तेथे उपनिरीक्षक विशाल देवरे यांनी मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. दादरला आलीस, पण पुढे काय करणार होतीस या पोलिसांच्या प्रश्नावर तिच्याकडे काही उत्तर नव्हते. मग पोलिसांनी तिच्या पालकांना बोलावून घेतले. अचानक मुलगी बेपत्ता झाल्याने तिचे पालक बेहाल झाले होते. पण भोईवाडा पोलिसांचा फोन येताच त्यांनी लगेच पोलीस ठाणे गाठले. उपायुक्त रागसुधा, वरिष्ठ निरीक्षक सुभाष बोराटे यांनी मुलीचे समुपदेशन केले. त्यानंतर मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. रागाच्या भरात घर सोडून आलेली मुलगी भरकटण्याआधीच भोईवाडा पोलिसांच्या हाती लागल्याने पुढील अनर्थ टळला.