
अनिकेत कोथळे याच्या खुनातील संशयित आणि बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा न्यायालयासमोर उलटतपास घेण्यात आला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या उलट तपासात कामटे याने, ‘मला काही आठवत नाही, माहितीही नाही,’ असा पवित्रा घेतला.
बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयामध्ये झाली. यावेळी बडतर्फ उपनिरीक्षक कामटे याचा उलट तपास घेताना सरकारपक्षातर्फे
अॅड. निकम यांनी सवाल उपस्थित केले. यावेळी घटनेदिवशी कामटे हा मिरजेत प्रशिक्षणासाठी गेल्याचे सांगण्यात आले.
याबाबतचा कोणताही कागदी पुरावा कामटे सादर करू शकला नाही. तसेच सरकारपक्षातर्फे उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर कामटे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ‘कागदपत्रांवरील सह्या माझ्या नाहीत, मला त्यावेळचे काही आठवतही नाही’, असाच पवित्रा त्याने यावेळी घेतला. तो वापरत असलेला फोनचा क्रमांकही आठवत नसल्याचेही त्याने न्यायालयासमोर सांगितले. कामटे याचे मूळ आडनाव कांबळे असे होते. त्याने त्या नावावर सीमकार्ड घेतले होते, हे न्यायालयासमोर निदर्शनास आणून देण्यात आले. त्यालाही कामटे याने नकार दिला. यावेळी विशेष सरकारी वकील निकम यांच्याशी बचाव पक्षाचे वकील पाटील यांची शाब्दिक चकमक उडाली. या खटल्याची पुढील सुनावणी ५ जुलै रोजी होणार आहे.
यावेळी सीआयडीच्या अधीक्षक मनीषा दुबुले, उपअधीक्षक प्रमोद नलवडे, तपास अधिकारी, निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकार पक्षाला मदत केली.