फडणवीसांची वॉर रूम, तर शिंदेंची कोऑर्डिनेशन रूम; वॉर रूमवरून महायुतीत कोल्डवॉर

महायुतीमध्ये सध्या वॉर रूमवरून कोल्डवॉर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूम सुरू केली. त्यांच्या वॉर रूमला शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट प्रकल्प संनियंत्रण कक्ष स्थापन केला. या दोघांवर मात करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या नावाखाली स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केली आहे. त्यामुळे महायुतीमधील बेबनाव यानिमित्ताने पुन्हा एकदा पुढे आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना एकनाथ शिंदे हजेरी लावत नाहीत. पालकमंत्रीपदाचा वाद निर्माण झाला तेव्हा एकनाथ शिंदे साताऱ्याला निघून गेले होते. राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीतील समावेशावरूनही देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यात वॉर रूमची भर पडली आहे. राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर वॉर रूम सुरू केली. त्यामुळे त्यांच्या वॉर रूमला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कोऑर्डिनेशन रूम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममधील बैठकांना सचिव आणि अधिकाऱ्यांना हजेरी लावणे बंधनकारक आहे. त्याच धर्तीवर एकनाथ शिंदे यांच्या कोऑर्डिनेशन रूममधील बैठकांना सचिव आणि अधिकाऱ्यांना उपस्थिती लावणे बंधनकारक होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर समांतर सत्तापेंद्र निर्माण करण्याची एकनाथ शिंदे यांची धडपड सुरू असल्याची चर्चा आहे.

महायुतीचे तंगडय़ात तंगडं

वॉर रूमच्या संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी, महायुतीमध्ये तंगडय़ात तंगडं घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे, अशा शब्दांत समाचार घेतला. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची रेषा वाढवावी असा सल्ला शिवसेनेला दिला. त्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मला शहाणपणा शिकवू नये. एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र व सहकारी होते. त्यांनी मला शिकवू नये. आम्ही काय करावे ते मला सांगू नये. त्यांनी त्यांची लाइन मारावी. त्यांनी तेच केले. जे सरकार भ्रष्टाचारातून, गद्दारीतून निर्माण झालेले आहे. सरकारचे ते प्रमुख होते याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले.