लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपने मित्र पक्षांच्या टेकूने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन केले. पण नव्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करताना अमित शहा (गृह), निर्मला सीतारामन (अर्थ), राजनाथ सिंह (संरक्षण), नितीन गडकरी (रस्ते विकास), शिवराजसिंह चौहान (कृषी), मनोहरलाल खट्टर (गृहनिर्माण), अश्विणी वैष्णव (रेल्वे) ही महत्त्वाची खाती भाजपने स्वतःकडे ठेवल्याने एनडीएच्या घटक पक्षांत धुसफूस सुरू झाली आहे. त्यातच तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू लोकसभा अध्यक्ष पदासाठी अडून बसले आहेत.
लोकसभेत भाजपची गाडी 240वरच अडकल्याने सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांनी गृह, अर्थ आणि इलेक्ट्रॉनिक्स या विभागांची मागणी केली होती. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे आणि कृषी मंत्रालयाची मागणी केली होती. मित्र पक्षांना मंत्रिमंडळात सन्मानजनक स्थान देण्याचा शब्द देणाऱ्या भाजपने मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर खाते वाटप करताना मात्र गृह, अर्थ, संरक्षण, कृषी, रेल्वे यासारखी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली. यामुळे भाजपपाठोपाठ एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयूमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. मिंधे गटाला स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री पद जरी दिले असले तरी मनासारखे खाते न मिळाल्याने महायुतीमध्ये खदखद आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना मिळाली ही जबाबदारी
नितीन गडकरी यांना रस्ते आणि परिवहन वाहतूक, पीयूष गोयल – वाणिज्य मंत्रालय, रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण, मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण, रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि प्रतापराव जाधव – आयुष मंत्रालयाच्या कारभाराची जबाबदारी दिली आहे.
मंत्रिमंडळात एकही मुस्लिम नाही
मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्री आहेत. यात पाच अल्पसंख्याक मंत्री असले तरी त्यात एकही मुस्लीम चेहरा नाही. रवनीतसिंग बिट्टू (शीख), हरदीपसिंग पुरी (शीख), जॉर्ज कुरियन (ख्रिश्चन), किरेन रिजिजू (बौद्ध) आणि रामदास आठवले (बौद्ध) या पाच अल्पसंख्याक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी पुरी, रिजिजू आणि आठवले हे यापूर्वीदेखील मंत्रिमंडळात होते. जॉर्ज कुरियन हे सध्या संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. भाजपचे केरळमधील ते प्रमुख नेते असल्याने त्यांची लवकरच राज्यसभेवर वर्णी लावण्यात येणार आहे.
मिंधे गटात अस्वस्थता
एनडीएचा घटक पक्ष असणाऱ्या चिराग पासवान, जीतन राम मांझी, एचडी कुमारस्वामी यांचे एक-दोन खासदार असताना त्यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले. मिंधे गटाला लोकसभा निवडणुकीत 7 जागा मिळालेल्या असताना चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री पद देऊन बोळवण करण्यात आली. यामुळे मिंधे गटात कमालीची अस्वस्थता असून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मिंधे गटाचे 7 खासदार असताना केवळ एकच राज्यमंत्री पद दिल्याने नाराजी व्यक्त केली.
पहिल्याच दिवशी मंत्र्यांचा पळ
केरळमध्ये लोकसभेत या वेळी भाजपने पहिल्यांदाच खाते उघडले. अभिनेते सुरेश गोपी त्रिशूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. एनडीए सरकारमध्ये भाजपकडून त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र मंत्री पदाची शपथ घेऊन चौवीस तास उलट नाहीत तोच गोपी यांनी मंत्री पदावर काम करण्यास आपल्याला रस नसल्याचे सांगत मंत्रिमंडळातून पळ काढल्याची चर्चा आहे. दरम्यान सुरेश गोपी यांनी माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.
लोकसभा अध्यक्षपद कुणाला?
लोकसभेचे अध्यक्ष पद हे खूपच महत्त्वाचे पद आहे. सभागृह चालवण्यासाठी सभापती पद हे पक्षविरहित पद मानले जात असले तरी घटक पक्षांच्या पाठिंब्यावरचे सरकार चालवत असताना लोकसभेचे अध्यक्ष पद सत्ताधारी पक्षासाठी खूपच महत्त्वाचे आहे. मोदींच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देताना काही महत्त्वाच्या खात्यांबरोबर लोकसभेच्या अध्यक्ष पदाची मागणी चंद्राबाबू नायडू यांनी भाजपकडे केली आहे. मात्र लोकसभेचे अध्यक्ष पद दुसऱ्या कोणत्याही पक्षाला भाजप द्यायला तयार नसल्याचे बोलले जात आहे. राज्यसभेचे उपसभापती पद जेडीयूकडे आहे. त्याप्रमाणे फार फार तर लोकसभेचे उपाध्यक्ष पद टीडीपीला दिले जाण्याची शक्यता आहे.