>> दिव्या नेरुरकर–सौदागर
नवरा–बायको हे नाते अत्यंत नाजूक असते. त्याच्या मर्यादाही असतातच. तसेच प्रत्येक नात्याप्रमाणे हे नातेही परिपूर्ण नसते, पण या नात्यातील दोन व्यक्ती नक्कीच संवादाच्या माध्यमातून नाते पूर्णत्वास नेऊ शकतात. एकमेकांशी केलेली तुलना, स्वतच्या जोडीदारावरील अविश्वास आणि तिसऱ्याच व्यक्तीवर अतिविश्वास नात्याला मारक ठरतो. निहार आणि रुची केवळ याच कारणामुळे वेगळे झाले होते. एक नाते बहरण्याआधीच कोमेजले होते.
“तुझं माझं खरंच जमेल असं वाटत नाही. आपण वेगळं होण्याचा विचार करू या का?’’ असं रुची निहारला (दोघांची नावे बदलली आहेत) म्हणाली आणि निहारच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या हातातला चहाचा कप हातातच राहिला आणि विस्मयाने तो तिच्याकडे पाहायला लागला. ‘‘काहीही काय बोलते आहेस तू? कळतंय का तुला? काही अ…’’ आणि पुढचे शब्द त्याने तोंडातल्या तोंडात गिळले.
‘‘बघ. पुन्हा अपशब्द वापरलेसच ना माझ्यासाठी. याच तुझ्या स्वभावाला हल्ली मी कंटाळले आहे. तुला माझा रिस्पेक्टच नाही वाटत.’’ रुची चिडून म्हणाली.
‘‘सॉरी! अगं, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण हे काय तू चालवलं आहेस मघापासून. रादर, गेल्या महिन्यापासून…’’ निहार कळकळीने म्हणाला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला.
‘‘हे बघ. मी ठरवलंय. आता याचा काहीच उपयोग नाही.’’ रुची निग्रहाने म्हणाली आणि बाजूला झाली.
गेल्या काही दिवसांत निहार आणि रुचीमधील भांडणे वाढत चालली होती. एकतर दोघेही एकमेकांना कमी भेटायचे. कारण दोघंही आपापल्या ऑफिसच्या कामांमध्ये गुंतलेले होते. त्यामुळे एकमेकांसाठी वेळ दोघांना देताच यायचा नाही.
त्यांच्या नात्याला तडा जायला अजून एक कारण होते. ते होते रुचीची बालमैत्रीण शरयू (नाव बदलले आहे). शरयू आणि रुची अगदी जीवश्चकंठश्च मैत्रिणी होत्या. दोघींनाही एकमेकींच्या आयुष्यातली घडणारी प्रत्येक गोष्ट ठाऊक असायची. निहार आणि शरयूचा नवरा हे दोघेही त्या दोघींच्या मैत्रीबद्दल जाणून होते.
‘‘तू शरयूशी बोलली आहेस का?’’ निहार काहीतरी आठवल्यासारखं तिला म्हणाला. ‘‘काय फरक पडतो? माझं ठरलंय’’ रुची एवढं बोलून आतल्या खोलीत गेली, पण त्याला विषय तिथेच संपवायचा नव्हता. निहारचा रुचीवर भरपूर जीव होता, ‘इतका टोकाचा विचार का येतोय तुझ्या मनात?’’ निहार आता काकुळतीला आला होता.
‘‘कारण मला तू वेळच देत नाहीस. मला एकटं वाटायला लागलं आहे. मी रात्री शिफ्टवरून बारा वाजता येते. घरी आले की, थोडा वेळही माझ्या बरोबर घालवत नाहीस.’’
‘‘अगं, मी दमून नाही का येत? व्हॉट्सअॅपवर कायम तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतोच ना.’’ निहार म्हणाला.
‘‘ते खूपच फॉर्मल असतं तुझं. अगदी शरयूच्या नवऱ्यासारखं. तोही अगदी असाच,’’ रुची रागाने म्हणाली. ‘‘लग्नाआधी माझ्या अशाच वेळा असायच्या. तेव्हा तू माझ्याशी रात्रीचे दोन-दोन तीन-तीन वाजेपर्यंत गप्पा मारायचास’’ असे सांगत रुचीने लग्नाआधीचा निहार आणि लग्नानंतरचा बदललेला निहार सांगायला सुरुवात केली. तेही अश्रूंच्या मदतीने.
सरतेशेवटी ‘‘तुझा माझ्यातला इंटरेस्ट संपला आहे ना? शरयूच्या नवऱ्यासारखाच.’’ असं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा त्याच्याही संयमाचा कडेलोट झाला. ‘‘वेडय़ासारखं बोलू नकोस. तो तिरसट आहे. मी आहे का तसा?’’ निहार म्हणाला. ‘‘काय माहीत?’’ असं म्हणत तिने खांदे उडवले. तरीही स्वतवर नियंत्रण ठेवत निहारने तिला वैवाहिक समुपदेशनाचा पर्याय सांगितला. कसेतरी निहारने तिला समुपदेशनासाठी तयार केले.
निहार आणि रुचीने, दोघांनीही स्वतबद्दल जुजबी ओळख सांगून समुपदेशनासाठी येण्याचे कारण सांगितले. रुचीने नंतर ‘मला तर यात तसाही इंटरेस्ट नाही. कारण माझं ठरलंय.’’ अशी पुस्ती जोडली.
‘‘अरे वा! म्हणजे तू थोडा तरी निहारच्या निर्णयाचा आदर करतेस’’ असं तिच्या लक्षात आणून दिल्यावर ती थोडी चमकली. ‘‘बरं, तुम्हाला एकमेकांना ऑफिसच्या वेळांमुळे वेळ देता येत नाही म्हणून समस्या तयार झाली आहे का?’’ या प्रश्नावर दोघांच्याही विरुद्ध प्रतिक्रिया आल्या.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे होकारार्थी हे उत्तर होते, तर तिच्या मते ‘ऑफिस’ हे दुराव्याचे कारण नव्हते, तर निहारचे तिला ‘गृहीत धरणे’ हे त्या मागचे खरे कारण होते. त्यासाठी तिने वानगीदाखल काही प्रसंगही सांगितले. जसे की, तिच्या अंगावर घरातील कामांची जबाबदारी टाकणे (बँकेचे व्यवहार, वस्तूंची खरेदी), काही घरगुती समारंभांना तिलाच जायला सांगणे. या सर्व गोष्टी रुची करतही होती. पण जेव्हा इतर जोडप्यांना पाहायची तेव्हा तिला त्याची कमतरता भासू लागे.
अशातच तिची बालमैत्रीण शरयू पुन्हा तिच्या संपर्कात आली आणि त्या दोघींची मैत्री पुन्हा फुलली. त्या दोघी तशाही घट्ट मैत्रिणी होत्याच. नंतर रुचीच्या एकटेपणाला तिची चांगली साथ मिळाली आणि त्या दोघी वरचेवर भेटायला लागल्या. गुजगोष्टी दोघींच्या होतच होत्या. शरयूचा स्वभाव हा काहीसा सडेतोड होता. ती रुचीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल रोखठोक मते व्यक्त करायला लागली. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शरयूचा नवरा हा तिचा कधीच आदर करत नव्हता. म्हणून स्वतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल शरयू नाराज होतीच. सतत स्वतचा नवरा आणि निहारमध्ये नकारात्मक साम्यही रुचीला जाणवू देऊ लागली.
‘‘…आणि ते खरंही आहे,’’ रुची म्हणाली. ‘‘म्हणून आम्ही दोघींनीही आपापल्या जोडीदारापासून वेगळं व्हायचं ठरवलं आहे.’’
‘‘तू खरंच वेडी आहेस का?’’ निहार जोरात ओरडला आणि भान येताच शांत बसला.
वास्तविक पाहता रुची कुठेतरी मैत्रिणीच्या बोलण्यात अशी वाहवत गेली की, तिला ‘कुठल्याही दोन व्यक्ती, त्यांचा दृष्टिकोन आणि जगण्याची पद्धत ही वेगळी असते’ हे उमगलेच नाही. दुर्दैवाने काही सत्रे झाल्यावरही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाच.
नवरा-बायको हे नाते अत्यंत नाजूक असते. त्याच्या मर्यादाही असतातच. तसेच प्रत्येक नात्याप्रमाणे हे नातेही परिपूर्ण नसते, पण या नात्यातील दोन व्यक्ती नक्कीच संवादाच्या माध्यमातून नाते पूर्णत्वास नेऊ शकतात. एकमेकांशी केलेली तुलना, स्वतच्या जोडीदारावरील अविश्वास आणि तिसऱ्याच व्यक्तीवर अतिविश्वास नात्याला मारक ठरतो. निहार आणि रुची केवळ याच कारणामुळे वेगळे झाले होते. एक नाते बहरण्याआधीच कोमेजले होते.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)