मंथन – समाजातले आपण

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

बलात्कार अथवा लैंगिक शोषण होते तेव्हा हजारपट तीव्रतेचा ‘मेंटल शॉक’ किंवा ‘ट्रॉमा’ पीडित व्यक्ती अनुभवत असतात. अशा वेळी समाज माध्यमांची आणि पीडितांच्या आजूबाजूच्या समाजाची जबाबदारी ही प्रचंड मोठी असते. म्हणजेच पीडितेला किंवा पीडितांना ‘भावनिक आधारा’सोबतच ‘भावनिक सरंक्षण’ देणेही तितकेच महत्त्वाचे असते आणि समाज व समाज माध्यमं हे ‘भावनिक संरक्षण’ देण्यात कमी पडत आहेत हे खेदाने नमूद करावेसे वाटतेय.

पिया ही पाच वर्षांची गोंडस मुलगी. मालिनी आणि केदारची (सर्व पात्रांची नावे बदलली आहेत) अत्यंत लाडाची लेक. घरची सुखवस्तू परिस्थिती असल्यामुळे तिच्या गरजा सहज पूर्ण होत होत्या. लग्नाच्या सात वर्षांनंतर पियाचा जन्म झाल्यामुळे मालिनी आणि केदारला अस्मान ठेंगणे झाले होते. ते दोघेही नोकरदार असल्यामुळे पियाच्या जन्माच्या सहा महिन्यांनंतर तिला कुठे सांभाळायला ठेवायचे? हा प्रश्न होताच आणि केदार तिच्या बाबतीत ओव्हरप्रोटेक्टिव्ह असल्यामुळे त्याने आधीपासूनच मालिनीला “पियाला पाळणाघरात ठेवायचे नाही” असा निर्णय घेतला होता.

‘’मी उगाच मूर्खपणा केला आणि असा निर्णय घेतला. तरी मालिनी मला सांगत होती की, पियाला पाळणाघर किंवा डे केअरमध्ये ठेवू, पण माझा आडमुठेपणा नडला आणि मी माझ्या मुलीच्या जन्माचं नुकसान केलं” तोंड ओंजळीत लपवून केदार केबिनमध्ये रडत रडत स्वतला दोष देत होता. मालिनीही स्वतच्या अश्रूंना न थांबवता त्याच्या पाठीवरून हात फिरवीत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करीत होती. पियाला घेऊन केदारची आणि मालिनीची आई या दोघी केबिनबाहेर बसल्या होत्या. पिया शांतपणे त्या दोघींच्या मध्ये बसली होती.

केदार आणि मालिनी हे दोघंही पियाला समुपदेशनासाठी घेऊन आले होते. तिला आणण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे ‘तिची लक्षात येण्याजोगी बदललेली वर्तणूक’. हल्ली ती अबोल होत चालली होती. तिची बडबड, मस्ती हेही लक्षात येईल इतपत थांबलं होतं. सतत आनंदी, उत्साही असणारी पिया आता चिडीचूप झाली होती. तिचा रागही वाढला होता. केदारला तर ती जवळही येऊ देत नव्हती की त्याच्याकडे जातही नव्हती.

‘’तुला आपली पिया बदलल्यासारखी वाटते का गं?” एक दिवस काळजीने त्याने मालिनीला विचारलंच. मालिनीही त्याच विचारात होती. शेवटी पियाला थोडा चेंज म्हणून ते दोघं तिला घेऊन एका मॉलमध्ये गेले. तेव्हाही तिने उत्साह दाखवला नाहीच. तिच्या आवडत्या गेम्स झोनमधेही ती रमली नाही. नेहमीसारखा ‘’बाबा, मला फ्रॉक पाहिजे” किंवा “आताच्या आता मला आईपीम दे” म्हणत तिथे तिने हट्टही धरला नाही. तेव्हाच दोघांनाही काहीतरी वेगळं घडल्याची जाणीव झाली.

‘’बच्चा, काय झालंय तुला? शाळेत कोणी काही बोललं का? बाबाकडे तू का जात नाहीस?” असं त्या रात्री मालिनीने जवळ घेत पियाला विचारलं. तेव्हा ‘’त्यानेही माझी चड्डी काढून स्वतची चड्डी काढली तर?” असं पिया निरागसपणे बोलून गेली.

‘’का…य…?’ मालिनी किंचाळलीच. केदारही लांब बसून त्या दोघींचे बोलणे ऐकत होता. तोही धावत बेडरूममध्ये आला आणि पियाजवळ बसत रडवेला होत म्हणाला, ‘’बाळा, काय बोलते आहेस तू?”

पिया आता मालिनीला एकदम बिलगून बसली आणि म्हणाली ‘’बाबा, मला जवळ घेऊन तुझी शू करायची जागा दाखवू नकोस हं. मला आजोबाने ऑलरेडी दाखवली आहे आणि मला ते बघून उलटी आल्यासारखं झालं. यक” असं म्हणून रडायला लागली. हे ऐकताच दोघांनाही जबर धक्का बसला.

‘’मॅम, आमच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या बाबानी हे असं… घाणेरडं… स्वतच्या नातीबरोबर…शी…मला त्या नालायक माणसाला बाप म्हणायचीसुद्धा लाज वाटते.”

मालिनीच्या शब्दांतून जणू निखारे निघत होते.  पिया ही बाल लैंगिक शोषणाचा बळी झाली होती आणि तिचे शोषण करणारी दुर्दैवाने तिच्या ओळखीतली व्यक्ती म्हणजे तिचे आजोबाच होती. झालेली घटना ही केदार आणि मालिनीच्या कल्पनेपलीकडेच होती. ‘’आमच्या बरोबरच का?” या प्रश्नातूनच ‘’आता आम्ही काय करायचं? एकीकडे नातं आणि दुसरीकडे बदनामी अशा कात्रीत ते दोघंही अडकले होते. शिवाय पियाच्या मनस्वास्थ्याला सांभाळून घेणं आणि तिला पुन्हा पहिल्यासारखी करणं हे शिवधनुष्य पेलायचंही होतं.

पिया आणि तिच्या पालकांना याबाबत समुपदेशन केले. समुपदेशनाच्या मदतीने पिया आता हळूहळू बोलती होत होती. योग्य तो प्रतिसादही देत होती. समुपदेशनाच्या सल्ल्याप्रमाणे केदार आणि मालिनीने वडिलांना जाब विचारला होता आणि त्यांना पोलिसांत देण्याची तयारीही केली होती. मालिनीची आई तर हे ऐकल्यावर धक्क्यामध्येच होती आणि ‘’मला हे कसं घरात राहूनही कळलं नाही” असं म्हणून  त्या तिरमिरीतच तिने राहतं घर सोडलं आणि ती या दोघांकडे पियाच्या संगोपनासाठी म्हणून राहायला आली. त्यात तिचं अपराधीपणही होतंच. मालिनी आणि केदारलाही तेव्हा एका आधाराची गरज होती. त्यामुळे त्यांनी तिला आपल्या घरी नेलं.

त्यांच्या कुटुंबात जी उलथापालथ झाली ती शेजाऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबातील मालिनीच्या वयाच्या बाईने तिला याबद्दल विचारले असता भावनेच्या भरात तिने सगळी हकीकत तिला सांगितली आणि काहीच दिवसांत पियाची गोष्ट हळूहळू सर्व सोसायटीला समजली. त्यात मालिनी आणि केदार हे दोघंही त्याच भागात लहानपणापासून राहत असल्याने दोघांच्याही कुटुंबांना सर्व ओळखतच होते. लोकांमधली कुजबुज वाढायला लागली होती आणि त्या दोघांना हे सगळं असह्य होत होतं. शेवटी ते दोघंही एका आघाताचा सामना करतच होते ना?

समुपदेशनाच्या वेळी शेवटी मालिनी बोलली. ‘’आता पियाच्या संरक्षणाची जबाबदारी तर आम्हीच घेतली आहे. मी तर  माझा जॉबही सोडला आहे. तिला आम्ही पुन्हा उभं करतोय. पहिल्यासारखी व्हावी म्हणून रात्रीचा दिवस करतोय, पण आमच्या सोसायटीचे काय?” ती  पुढे सांगायला लागली, ‘’माझ्या पियाचं समजल्यापासून शेजारच्यांनी त्यांच्या मुलींना पियाबरोबर खेळायला पाठवणं बंद केलंय.”

केदारनेही त्यावर ‘री’ ओढली, ‘’खरं आहे हे. पिया आता एकटीच असते. आपल्याच खोलीत. मीही जेव्हा ऑफिसमधून सोसायटीत शिरतो तेव्हा एकदोन वेळा मी मार्क केलं की, खाली ग्राऊंडवर असणाऱ्यांमध्ये कुजबुज चालू असते. मला त्या वेळी इतकं ऑड वाटतं…” तो मनातली खदखद सांगत होता. ‘’आता आम्ही दोघांनी तर सोसायटीच्या आवारात फिरणंही बंद केलं आहे. पियाला घेऊन जेव्हा केव्हा बाहेर पडतो तेव्हा एक शो पीस असल्यासारखं तिच्याकडे सोसायटीतले लोक बघत असतात. तीही बिचारी बावरून जाते. एक आघात काय कमी जखमी करून गेलाय आमच्या मुलीला.” सांगताना केदारच्या डोळ्यांत पाणी तरारलं.

‘’पण आता सगळंच सगळ्यांना माहीत झालंय आणि आम्हाला मॅग्निफाइंग ग्लासमधून बघितल्यासारखं वाटतंय. आमच्या सोसायटीतल्या दयेच्या नजरा आम्हाला जगणं नकोसं करताहेत. म्हणून आम्ही सोसायटी सोडतोय” एका दमात केदार म्हणाला. त्याच्या बोलण्यातून निराशा, असहायतेचे भाव उमटले. शेवटी त्या दोघांनीही राहती जागा सोडली आणि दुसरीकडे फ्लॅट बुक केला.

ही केस माझ्याकडे साधारण सहा वर्षांपूर्वी आली होती. आता पियाची केस आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत घडलेल्या लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या घटना आणि ज्या पद्धतीने त्या घटनांचे विश्लेषण आणि चर्चा विविध माध्यमांतून चालू आहे ते पाहता त्याचे गांभीर्य आहे की नाही, इतपत शंका येऊ लागली आहे.

जेव्हा बलात्कार अथवा लैंगिक शोषण होते तेव्हा ती व्यक्ती कुठल्या मानसिकतेमधून जात असेल याची कल्पनाही करवत नाही. हजारपट तीव्रतेचा ‘मेंटल शॉक’ किंवा ‘ट्रॉमा’ पीडित व्यक्ती अनुभवत असतात. अशा वेळी समाज माध्यमांची आणि पीडितांच्या आजूबाजूच्या समाजाची जबाबदारी ही प्रचंड मोठी असते. म्हणजेच पीडितेला किंवा पीडितांना ‘भावनिक आधारा’बरोबरच ‘भावनिक सरंक्षण’ देणेही तितकेच महत्त्वाचे असते आणि समाज व समाज माध्यमं हे ‘भावनिक संरक्षण’ देण्यात कमी पडत आहेत हे खेदाने नमूद करावेसे वाटतेय.

समाज माध्यम हे आपल्याला लाभलेलं वरदान आहे आणि  त्याला गांभीर्याने घेण्याची  गरज आहे. कारण ते चालवणं ही शेवटी आपली ‘नैतिक जबाबदारी’ आहे. कुठलीही अशी घटना घडली तर सर्वप्रथम पीडित आणि तिच्या परिवाराचे बाइट्स मिळवण्यासाठी आणि त्यातून रील्स बनवण्यासाठी हल्ली जी खटपट चालली आहे ते बघणं अतिशय क्लेशकारक आहे. कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडित डॉक्टर मुलीचे आज समाज माध्यमांवर बरेचसे रील्स उपलब्ध आहेत. ते ज्या प्रकारे बनवले गेलेले आहेत ते बनवणाऱ्या व्यक्तींना एकच प्रश्न विचारावासा वाटतो, ‘’काय सिद्ध करायचे आहे?”

कारण या अशा प्रकारांतून मला नाही वाटतं की, त्या व्यक्तीचे भोग संपत तरी असतील  किंवा दुःख कमी  तरी होत असेल. आज बदलापूर केस असो किंवा तत्सम कुठली घटना, समाज ज्या प्रकारे या घटनांवर व्यक्त होतो तीही एक चिंतेची बाब बनत चालली आहे. कारण सुरुवात जरी सहानुभूतीने होत असली तरी  तिचा प्रवास दयेच्या मार्गाने होत शेवट दोषाने होतोय (‘’त्या मुलीची / महिलेची चूक असेल. जायचंच कशाला?”/ “कपडे तसे का घातले?” इत्यादी.)

समाजमनही बदलायला हवंय. या बदलामुळे या घटना कितपत कमी होतील हे सांगू नाही शकत. कारण ती एक विकृती आहे. जो विषयच वेगळा आहे, पण अशा घटनांचा बळी पडलेल्या  व्यक्तींचा आधार बनण्यासाठी शेवटी एक सामाजिक गरज म्हणून आपल्यालाच त्यांच्या साथीने उभं राहावं लागणार आहे. कारण चूक त्यांची मुळी नव्हतीच.

मेणबत्त्यांची निदर्शनं असोत किंवा बंद असोत, त्यामुळे समाज जे त्या पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रतीत करतो आहे, त्यातून समाजाची जरी संवेदनशीलता दिसत असली तरी याच  समाजाने या सगळ्याचा वारंवार आधार घेण्यापेक्षा त्या पीडितांना आणि अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून सामाजिक जबाबदारी म्हणून काही पावलं उचलली पाहिजेत. म्हणजेच;

– लैंगिक शिक्षणाविषयी जागृती आणि ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वीकारणं.

– लहान मुलं आणि मुली या दोघांनाही ‘चांगल्या-वाईट स्पर्शा’चे ज्ञान

– आपल्या आजूबाजूला, परिसरात काही आक्षेपार्ह व्यक्ती किंवा घटना घडणार असेल तर त्याविषयीची जागरूकता.

öहेल्पलाइन संपर्कासाठी सजगता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे;

– पीडितांचा कुठल्याही विशेषणाशिवाय स्वीकार  तसेच;

– पीडितांच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी प्रयत्नांची सुरुवात होणेही आवश्यकच आहे.

कारण वेळ ही कोणावरही सांगून येत नाही. म्हणून ’आपण नाही ना?’ म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकतानाच जे दुर्दैवी या अशा घटनांना बळी पडले आहेत त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आपापल्यापरीने नक्कीच पावले आपण उचलू शकतो. नाही का?

[email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)