सलाम त्यांच्या जिद्दीला! दिव्यांग गाठणार कळसूबाई शिखर

नशिबाने आलेल्या शारीरिक व्यंगावर मात करीत आणि अफाट जिद्दीचे दर्शन घडवत कळसूबाई सर करण्यासाठी तब्बल 60 दिव्यांग सज्ज झाले आहे. शनिवारी हे गिर्यारोहक अनोख्या मोहिमेवर निघणार आहेत. त्यांच्यावर आतापासूनच कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जागतिक दिव्यांग दिन नुकताच पार पडला. या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी फिनिक्स फाऊंडेशन दिव्यांग आणि अंध व्यक्तींचे  मनोबल वाढावे यासाठी सह्याद्री येथील डोंगररांगांमध्ये मोफत मोहीम आयोजित करते. यंदा 7 आणि 8 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई येथे गिर्यारोहण मोहीम आयोजित करण्यात आली आहे.  यामध्ये 60 अपंग आणि 10 अंध सहभागी होतील. त्यांच्यासोबत फिजियोथेरपिस्ट, डॉक्टर, प्रशिक्षित स्वयंसेवक अशी टीम असेल.

शनिवारी सकाळी 11 वाजता विलेपार्ले पूर्व येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे सर्वजण एकत्र येऊन मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. रविवारी पहाटे 4 वाजता कळसूबाईच्या दिशेने कूच करतील अशी माहिती फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष संसारे यांनी दिली.

फिनिक्स फाऊंडेशनतर्फे गेली 19 वर्षे अशा मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 1500 जणांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब, मुंबईने आर्थिक भार उचलला आहे. समाजात दिव्यांगांना आर्थिक, व्यावसायिक, कृत्रिम साधने देणाऱया संस्था आणि व्यक्ती खूप आहेत. मात्र तरीही दिव्यांग मनाने दिव्यांग राहतात. पण त्यांचे मनोबल गिरीभ्रमंतीच्या माध्यमातून वाढवण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशन 2001 पासून करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या