
वसुबारसने आज दीपावलीला दिमाखात सुरुवात झाली असून फटाकेही फुटू लागले आहेत. मात्र दिवाळीत फक्त 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवता येणार आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मध्यरात्री 12 वाजेपर्यंत फटाके वाजवता येणार आहेत. फटाके वाजवताना ‘डेसिबल’ची मर्यादाही पाळावी लागणार आहे. अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
दिवाळ सणात मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर बेफामपणे फटाके पह्डले जातात. मात्र फटाक्यांच्या कर्णकर्पश आवाजामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊन मानवी आरोग्याला धोका पोहोचतो. शिवाय आजारी माणसे, ज्येष्ठ, लहान मुले आणि मुक्या प्राण्यांनाही फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होतो. त्यामुळे पोलिसांनी फटाके वाजवण्यासाठी नियमावली घालून दिली आहे. ही नियमावली मुंबईकरांनी काटेकोरपणे पाळावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
चार क्षेत्रांसाठी आवाजाची मर्यादा
औद्योगिक क्षेत्र – 75 डेसिबल दिवस, 70 डेसिबल रात्री
व्यावसायिक क्षेत्र – 65 डेसिबल दिवस, 55 डेसिबल रात्री
निवासी क्षेत्र – 55 डेसिबल दिवस आणि 45 डेसिबल रात्री
शांतता क्षेत्र – 50 डेसिबल दिवस आणि 40 डेसिबल रात्री